जळगावमध्ये तरूणीला गुंगीचे औषध देवून अपहरण अन् हैदराबादमध्ये ठेवले डांबून | पुढारी

जळगावमध्ये तरूणीला गुंगीचे औषध देवून अपहरण अन् हैदराबादमध्ये ठेवले डांबून

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

शहरातील २६ वर्षीय तरुणीला शीत पेयामध्ये गुंगीचे औषध देवून तिचे अपहरण करत हैदराबादला नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात २६ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १३ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह (रा. नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, तेलंगाणा) याने तरूणीला तिच्या राहत्या घरात शितपेयमध्ये गुंगीचे औषध देवून तिला बेशुध्द केले. त्यानंतर तिला कारमधून लग्न लावण्यासाठी हैद्राबादला घेवून गेला.

यानंतर तेथे तरूणीला दोन दिवस तिच्या इच्छेविरूध्द घरात डांबून ठेवले. यात दरम्यान तरूणीला मारहाण सुध्दा केली. तसेच तरूणीच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना मोबाईलद्वारे खोटी माहिती देवून बदनामी केली. अखेर आज मोहम्मदच्या तावडीतून सुटून तरूणीने जळगाव गाठले.

यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरूणीने संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह याच्याविरोधात तक्रार देवून गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button