‘त्या’ जहाजातील ६६ जण कोरोना बाधित, निगेटीव्ह आलेल्यांना बंदरावर उतरण्यास मुभा | पुढारी

'त्या' जहाजातील ६६ जण कोरोना बाधित, निगेटीव्ह आलेल्यांना बंदरावर उतरण्यास मुभा

वास्को, पुढारी वृत्तसेवा: मुंबईहून रविवारी मुरगाव बंदरात आलेल्या कार्डोलियाच्या इम्प्रेस क्रुझवरील ६६ जणांचे कोविड, आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालात पॉझिटिव्ह आलेल्याना मार्गदर्शक तत्वानुसार  इस्पितळामध्ये दाखल केले आहे. निगेटीव्ह अहवाल आलेल्या प्रवाशांना जहाजावरून खाली उतरण्यास परवानगी मिळणार आहे.

प्रवाशी जहाजावरील फक्त एकाच कर्मचार्‍याला कोविडची लागण झाल्याचा दावा जहाजाच्या स्थानिक शिपिंग एजंटामार्फत रविवारी केला होता. सोमवारी ६६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. याची गंभीर दखल सरकारी यंत्रणांनी घेतली. एमपीटी, आरोग्य विभागाचे व इतर सरकारी यंत्रणांचे अधिकारी तेथील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

प्रवासी जहाज मुंबईहून मुरगाव बंदरात येण्यापूर्वी स्थानिक शिपिंग एजंटला त्या जहाजावरील एका कर्मचार्‍याची अँटीजेन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी ती माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, एमपीटी प्रशासन, आरोग्य संचालनालय व इतर यंत्रणांना दिली होती. यानंतर या जहाजातील कोणीही खाली उतरू नये यासाठी ते जहाज बंदरापासून दूरवर नांगरून ठेवण्याचे निर्देश क्रूझच्या कॅप्टनला देण्यात आले होते.

संबंधित बातम्या

जहाजावर एकूण २ हजार १७ जण

कोणासही जहाजावरून उतरण्यास, जहाजावर चढण्यास परवानगी नव्हती. त्या जहाजावर अधिकारी, कर्मचारी व प्रवाशी मिळून २ हजार १७ जण होते. त्या सर्वांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका इस्पितळातील २५ ते ३० कर्मचार्‍यांना जहाजावर नेण्यात येऊन त्या सर्वाची आरटीपीसीआर करण्यात आली. त्यासंबंधीचा काहीजणांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाल्यावर त्याची लागण फक्त एकालाच नव्हे तर आणखी ६६ जणांना झाल्याचे उघड झाले. यासंबंधीचा नेमका आकडा मिळू शकला नाही. मात्र, या दरम्यान अहवाल निगेटीव्ह आलेल्यांना जहाजावरून खाली उतरण्याची मुभा मिळणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button