पुणे : लग्नाच्या आमिषाने वकील महिलेवर पोलिसाकडून अत्याचार | पुढारी

पुणे : लग्नाच्या आमिषाने वकील महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

पुणे, पुढारी वृत्तसेवा

लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकिलाशी अनैतिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मेट्रोमोनियल साईटवर दोघांची ओळख झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पोलीस काँस्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण गंगाधर राऊत (वय ३३, रा. पत्रा चाळ, पाषाण मुळ रा. लोणी काळभोर) असे त्‍याचे नाव आहे. सध्या तो पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या ‘एटीएस’ सेलमध्ये कार्यरत आहे. याबात एका २९ वर्षाच्या महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वकील महिला आणि लक्ष्मण राऊत यांची मार्च २०२० मध्ये मेट्रोमोनियल या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. राऊत याने महिलेचा मोबाईल घेऊन तिच्याशी ओळख वाढविली. यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून देहुरोड पिंपळे निलख येथील लॉजवर नेऊन तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले.

यानंतर त्याने काही दिवसांनी लग्नास नकार दिल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर वकिल महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेचा चतु:श्रृंगी पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button