देवळा (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री (दि. १५) रोजी देवळा तालुक्यातील सावकी येथील आदिवासी वस्तीत घडली आहे.
कुटुंबिय झोपेत असताना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
देवळा तालुक्यातील सावकी येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या पठाण कचरू सोनवणे यांचे मातीचे घर आहे. काल झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या भितींत पाणी मुरल्याने त्या घराची भिंत रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोसळली.
घरात गाढ झोपेत असलेले पठाण सोनवणे त्यांची पत्नी सुनीता सोनवने त्यांचा पाच वर्षीय मुलगा आकाश सोनवणे व सात वर्षीय मुलगा कुणाल सोनवणे यांच्या अंगावर ती भिंत कोसळली. कोसळल्याचा आवाज ऐकून शेजारी व आजूबाजूचे ग्रामस्थ धावत आले.
ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्वांना त्यांनी घराबाहेर काढले यामध्ये तिघांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना पाच वर्षीय आकाश पठाण सोनवणे या चिमुकल्याचा वाटेतच मृत्यू झाला तर सुनीता पठाण सोनवणे (वय २७) व कुणाल पठाण सोनवणे (७) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पठाण सोनवणे (२९) याला किरकोळ दुखापत झाली आहे.या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेचा पंचनामा तलाठी कल्याणी कोळी ग्रामसेवक वैशाली पवार यांनी केला असून शासनाने तात्काळ या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देवळा पोलिस ठाण्यात या घटनेबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.