आता नखांनी करा शॉपिंग! | पुढारी

आता नखांनी करा शॉपिंग!

दुबई : आता तुम्हाला चक्क नखांनी शॉपिंग करता येणार आहे. समजा तुम्ही खरेदी करण्यासाठी गेला आहात आणि वॉलेट म्हणजे पैशाचे पाकीट आणि पैशाचे स्मार्टकार्ड असे दोन्ही घरीच विसरला आहात तर? अशा वेळीही शॉपिंग करण्याची सोय आता दुबईत निर्माण झालेली आहे. ही खरेदी चक्क तुमच्या नखांनी करता येऊ शकते. अर्थातच ही नखे साधी नखे नसून ती ‘स्मार्टनेल’ बनलेली आहेत.

आपल्या शरीराबरोबर नेहमी असणारा एक भाग म्हणजे नखं. या छोट्याशा नखांमध्ये तुम्ही बराच खजिना ठेवू शकता. दुबईतील काही लोक आता अशी नखांनी खरेदी करीत आहेत. दुबईत सध्या मायक्रोचिप मॅनिक्योर चर्चेत आहे. यामध्ये लोक आपले क्रेडिट आणि डेबिट कार्ड आपल्या नखांवर घेऊन फिरतात.

नखांवर एक छोटीशी मायक्रोचिप लावली जाते आणि तुमचं नखच चालतं-फिरतं बिझनेस कार्ड बनतं. ‘लॅनोर ब्युटी लाँज’कडून ही सेवा दिली जात आहे. हे तंत्र म्हणजे ‘निअर फिल्ड कम्युनिकेशन’ (एनएफसी)वर काम करणारे एक ‘शॉर्ट रेंज वायरलेस टेक्नॉलॉजी’ आहे. ते स्मार्टफोन, पेमेंट कार्ड आणि अन्य उपकरणांना आणखी स्मार्ट बनवते.

सलूनमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या नखांवर ही चिप लावावी लागेल. यासाठी कोणतीही सर्जरी करण्याची किंवा इंजेक्शनचीही गरज नाही. नखांच्या वरील भागावर ही चिप लावली जाते आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठी खास कोटिंग केले जाते. तुमच्या सोशल मीडियापासून बिझनेस कार्डपर्यंतचा सर्व डेटा या छोट्याशा चिपमध्ये टाकला जातो. तुम्हाला गरज असेल त्यावेळी स्कॅन करून तो डिकोड केला जातो. दुबईत सुमारे 500 लोकांना ही सर्व्हिस देण्यात आली आहे.

Back to top button