

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली महापालिका क्षेत्रात 'कोरोना'चे सुपर स्प्रेडर ठरणार्या घटकांचे लसीकरण वाढवा. 'होम आयसोलेशन'वर जादा देखरेख ठेवा. सांगली महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशन कमी करून रुग्णांच्या इन्स्टिट्युटशनल आयसोलेशनला अधिक प्राधान्य द्या, अशा सूचना राज्याचे आरोग्य सल्लागार व कोरोना नियंत्रण टास्क फोर्सचे संचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिल्या.
डॉ. साळुंखे यांनी गुरुवारी महापालिकेला भेट दिली. आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, आरोग्यअधिकारी डॉ. रवींद्र ताटे उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात महापालिका प्रशासनामार्फत राबवित येत असणार्या कोरोना नियंत्रण उपाययोजनांची डॉ. साळुंखे यांनी माहिती घेतली.
महापालिका क्षेत्रातील लसीकरण, विनामास्क कारवाई, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई याबाबत डॉ. ताटे यांनी माहिती दिली.
महापालिका क्षेत्रात सुपर स्प्रेडर ठरणार्या घटकांचे लसीकरण वाढवा. बाहेरहून येणार्यांची अधिक माहिती घ्या. तपासण्या वाढवा. होम आयसोलेशनमधील रुग्णांवरील देखरेख वाढवा.
होम आयसोलेशन कमी करून इन्स्ट्यिुटशनल आयसोलेशन वाढवा. मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी कडक भूमिका घ्या.
गर्दी होणारे कार्यक्रम होऊ देऊन नका. त्याबाबत कटाक्ष रहा, अशा सूचना डॉ. साळुंखे यांनी दिल्या.
महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेल्या ठिकाणी अधिकाधिक लसीकरण करण्याचे नियोजन करा, अशा सुचनाही डॉ. साळुंखे यांनी महापालिका आरोग्य यंत्रणेला दिल्या.
आयएलआय (इनफ्ल्युएंझा लाईक इलनेस- सर्दी, ताप, खोकला), सारी (श्वसनाला त्रास) रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार होत असतात.
त्यापैकी काही रुग्ण कोरोना रुग्ण असू शकतात.
त्यांची कोरोना चाचणी न झाल्यास ते समाजात वावरतील व कोरोनाचा संसर्ग वाढेल.
त्यामुळे आयएलआय व 'सारी'ची लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासंदर्भातही नियोजन करा, अशा सूचना महापालिकेला दिल्या.
ज्या व्यक्ती कामानिमित्त नित्यनियमाने ये-जा करत असतात. रोज अधिक व्यक्तींशी संपर्क येतो, अशा व्यक्ती 'कोरोना'च्या सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात. भाजी विक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार, कामगार, फेरीवाले व अनुषंगिक अन्य घटक सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात. त्यांची दर पंधरा दिवसांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट गरजेची असते. 'सुपर स्प्रेडर्स'चे लसीकरण प्राधान्याने करणे अंत्यत आवश्यक आहे.