नाशिक : सिटीलिंक बसला ४० कोटींचा तोटा, मनपा प्रशासनाची वाढली चिंता | पुढारी

नाशिक : सिटीलिंक बसला ४० कोटींचा तोटा, मनपा प्रशासनाची वाढली चिंता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेची सिंटीलिंक बससेवा गेल्या काही दिवसांपासून तोट्यात धावत असून, हा तोटा भरून काढण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनाही सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत. गेल्या वर्षी असलेला तब्बल ३६ कोटींचा तोटा आता ४० कोटींवर गेल्याने मनपा प्रशासन चिंतेत आहे. विशेष म्हणजे तूट कमी करण्यासाठी १ जानेवारी २०२३ पासून केलेली सरासरी सात टक्के भाडेवाढही तोटा कमी करण्यास किंवा स्थिर ठेवण्यास पुरेशी ठरलेली नाही. त्यामुळे आता इतर उपाययोजनांवर महापालिका प्रशासनाकडून विचार केला जात आहे.

महापालिकेने सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळावी, यासाठी सिटीलिंक बससेवा सुरू केली. सुरुवातीला ५० बसेसने सुरू झालेल्या या सेवेच्या आजमितीस 200 बसेस रस्त्यावर धावत आहेत. मात्र, जितक्या अधिक बसेस रस्त्यावर धावतील तितका तोटा वाढेल, असे सूत्र झाल्याने, तोटा कमी करण्यात विविध योजनांसह भाडेवाढही अपयशी ठरली आहे. दि. ८ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत सुमारे ३० कोटी रुपयांचा तोटा नोंदविला गेला. त्यानंतर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान, त्यात वाढ होऊन तो सुमारे ३६ कोटींवर पोहोचला. सद्यस्थितीत हा तोटा ४० कोटींवर गेल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वास्तविक, प्रवाशांचा बससेवेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सीएनजीचे वाढते दर तोटा वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात सिटीलिंकच्या बसेस ५० मार्गांवर धावत होत्या. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. सिटीलिंकच्या २५० बसेस असून, त्यापैकी दररोज 200 हून अधिक बसेस ६५ हून अधिक मार्गांवर धावतात. शहरासह ग्रामीण भागातही बसेस धावत आहेत. मात्र, सर्वच मार्गांवरील बसेस तोट्यात असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिबस किमीमागे १० रुपये तोटा

सिटीलिंकच्या सर्वच मार्गांवरील बसेस तोट्यात धावत आहेत. जितक्या बसेस रस्त्यावर धावतील, तितका तोटा वाढेल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत प्रतिबस १० रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे तोटा नोंदविला जात आहे. हा तोटा भरून काढणे जवळपास अशक्य असून, त्यात आणखी वाढ होण्याची भीतीही प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button