

शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बेवारस वाहन मालकांच्या शोधासाठी 'गंगामाता वाहन शोध संस्था'ची पोलिसांनी मदत घेतली असून, 105 वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या व अपघातग्रस्त अनेक वाहने शेवगाव पोलिस ठाण्याच्या आवारात धुळ खात पडून आहेत. या वाहनांचे मालक शोध घेतला, तर ही वाहने हस्तगत करण्यास येतील, असा पोलिसांचा अंदाज होता.
मात्र, न्यायालयीन प्रक्रियेने किंवा त्यांचा शोध लागत नसल्याने अनेक वाहने मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडली होती. या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मोहिम हाती घेतली असून, बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन, ती मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश शेवगाव पोलिसांना दिले आहेत. यामुळे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम शेवगाव पोलिसांनी बरंदवाडी (ता. मावळ जि. पुणे) येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने सुरू केला आहे.
या मदतीने वाहन चेसी व इंजिन क्रमांकाच्या आधारे 105 बेवारस वाहन मालकांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. या मोहिमेत पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, परिवीक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके, पोलिस कर्मचारी संगीता पालवे, रवींद्र शेळके, सुनील रत्नपारखी, संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, संजय काळे, भारत वाघ यांनी सहभाग घेतला.
न्यायालयाच्या आदेशाने लवकरच शोध झालेली वाहने मालकांच्या स्वाधिन करण्यात येणार आहेत. तर, वाहन प्रकार, चेसी क्रंमाक, इंजिन क्रंमाक, मालकाचे नाव व पत्ता याची यादी पोलिस ठाण्यात लावण्यात आली. यानुसार ओळख पटवून 15 दिवसात मालकांनी आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन शेवगाव पोलिसांनी केले.
हेही वाचा