Nashik Bus Accident : ‘प्रवासानंतर दहा मिनिटांतच बसले हादरे’; बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अंगावर शहारे आणणारा तो प्रसंग | पुढारी

Nashik Bus Accident : 'प्रवासानंतर दहा मिनिटांतच बसले हादरे'; बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अंगावर शहारे आणणारा तो प्रसंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगगडावरून दर्शन घेऊन निघाल्यानंतर आम्ही अत्यंत प्रसन्न मनाने आजूबाजूचा हिरवागार निसर्ग डोळ्यात भरून प्रवास करत होतो. घाटात मध्येच दिसणारे धबधबे, धुके हे पाहत आम्ही बस हळूहळू घाट उतरत चालली होती. बस एका वळणावर आलेली होती. आमचा प्रवास सुरू होऊन अवघे १० ते १५ मिनिटच झाले होते…अन् अचानक मोठा आवाज झाला अन् बसला हादरे बसण्यास सुरुवात झाली. आमची बस थेट संरक्षक कठडा तोडून दरीच्या दिशेने सुसाट निघाली. बस दरीत खाली जाताना आम्हाला दिसत होती. परंतु देवीच्या कृपेने बस पलटी झाली नाही अन् आम्ही बचावलो….

अपघाताचा हा आँखो देखा हाल आहे जखमी प्रवाशांचा. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी १५ मिनिटांत बचावासाठी धाव घेतल्याने आम्ही वेळेत रुग्णालयात पोहोचलो, अशी माहिती जखमी प्रवाशांनी दिली. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमी प्रवाशांनी आम्ही अक्षरशः मृत्यूचा दाढेतूनच बचावल्याची प्रतिक्रिया दिली. सप्तश्रृंगी मातेनेच आमचे रक्षण केले, अशी बोलकी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली.

स्टेअरिंग घट्ट पकडल्याने बचावले प्रवासी

बुधवारी (दि. १२) सकाळी साडेसहाच्या सुमारास सप्तश्रृंगगडावरून निघालेल्या एमएच ४० एक्यू ६२५९ क्रमांकाच्या बुलढाण्यातील खामगाव आगारातील बसला भीषण अपघात झाला. गडाजवळील गणपती पॉइंटजवळ दाट धुक्यामुळे अंदाज न आल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट दरीच्या दिशेने गेली. दरीत बस उतरत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर चालकाने स्टेअरिंग घट्ट पकडून ठेवल्याने बस नियंत्रित राहिली आणि झाडाला थडकून थांबली.

चेहरे, हातापायाला जखमा

बसला प्रचंड हादरे बसण्यास सुरुवात झाल्याने बसमधील वृद्ध प्रवासी भयभीत झाले. बस शेकडो फूट खाली जाऊन थांबल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, हादरे बसल्यामुळे अनेकांना चेहऱ्यास, हाता-पायास गंभीर दुखापती झाल्याचे आढळून आले. गावातील नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केल्याने जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळाली.

मुडी गावातील सर्वाधिक प्रवासी

बसमधील २२ पैकी १५ प्रवासी अमळनेर तालुक्यातील मुडी गावातील होते. त्यापैकी आशा राजेंद्र पाटील (५५ रा. मुडी, अमळनेर) यांचा मृत्यू झाला.

मंत्री अनिल पाटील यांची धाव

दरम्यान, जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यमान मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.

गडावर मंगळवारी रात्री मुक्कामास होतो. खामगाव ते नंदुरबार गाडी होती. रात्री जेवण करून झोप व्यवस्थित झाली. ६.३० ला निघालो. १० ते १२ मिनिटांत गणपती पॉइंट म्हणून ठिकाणाजवळ बस आली. मात्र, धुके जास्त असल्याने वळण घेताना चालकाच्या लक्षात आले नसेल. धुक्यामुळे गाडीचा अपघात झाला. बसमध्ये २२ प्रवासी होते.

– पुरुषोत्तम नारायण टिकार, वाहक (कंडक्टर)

मी स्टेअरिंग पक्के पकडल्याचे आठवते. पण, बस धडकल्यानंतर मला काहीच आठवत नाही.

– गजानन पांडुरंग टपके, चालक

प्रवास सुरू असतानाच अचानक हादरे बसले. अपघाताची भीषणता तीव्र होती. अपघातग्रस्त बस पाहिल्यानंतर मनात धस्स झाले. स्थानिकांनी अपघातानंतर १५ मिनिटांत पोहोचून आम्हाला मदत केली. स्थानिकांच्या मदत व सप्तश्रृंगी देवीच्या आशीर्वादामुळे आम्ही वाचलो.

बाळू पाटील, जखमी प्रवासी

जिल्हा रुग्णालयातील जखमींची नावे

गजानन पांडुरंग टपके (३९, चालक, रा. अकोला), पुरुषोत्तम नारायण टिकार (४२, वाहक, रा. अकोला), प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर (६५), सुशीलाबाई सोनू बडगुजर (२७), सुरेखाबाई हिरालाल बडगुजर (४३), भारगोबाई माधवराव पाटील (५२), वच्छलाबाई साहेबराव पाटील (६५), जिजाबाई साहेबराव पाटील (६५), संजय बाळीराम भोईर (६०), विमलबाई अक्रत भोई (५९), प्रतिभा संजय भोई (४५), संगीता मंगुलाल भोई (५६), सुशीलाबाई बबन नजान (६४), रत्नाबाई (सर्व रा. मुडी, अमळनेर), मुन्सी दगू खाटील (६८, रा. साक्री, धुळे), ज्योती उमेश पाटील (२९, रा. खडकशिरपूर, धुळे), रघुनाथ बळीराम पाटील (७०), बाळू भावलाल पाटील (४८, दोघे रा. भोकर, जळगाव), आशाबाई वामन सूर्यवंशी (७५, रा. पंचेश्वर, निफाड), लक्ष्मीबाई काळू गव्हाणे (४०), यमुना रामदास गांगुर्डे (४०, दोघे रा. सप्तश्रृंगगड)

जखमींच्या कपाळावर नावांची चिठ्ठी

जिल्हा रुग्णालयात जखमींना आणल्यानंतर त्यांच्यावर उपचार करताना कपाळावर नावांची चिठ्ठी लावण्यात आली. हा प्रकार चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने कपाळावरील चिठ्ठी काढून हातावर लावली. उपचार करताना सर्वांना रुग्णाची ओळख व्हावी, यासाठी चिठ्ठी लावण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार झा यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button