नाशिक : पोलिसाचे घर फोडणारा चोरटा ॲम्बिस प्रणाली’चा वापर करुन केला जेरबंद | पुढारी

नाशिक : पोलिसाचे घर फोडणारा चोरटा ॲम्बिस प्रणाली'चा वापर करुन केला जेरबंद

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येवला शहराजवळच असलेल्या अंगणगाव येथील पोलिस वसाहतीमध्ये दिवसा पोलिस कर्मचाऱ्याचेच घर फोडणाऱ्या अट्टल गुन्हेगारास येवला शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले आहे. येवला तालुक्यात या पद्धतीचा प्रथमच वापर करून गुन्हेगार जेरबंद करण्यात आला आहे.

मे महिन्यात दुपारी अंगणगाव पोलिस वसाहतील इमारत क्रमांक दोनमधील रूम क्रमांक सहामध्ये चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील साडेचार तोळे सोने व चांदी असा सुमारे ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपाल केला होता. या गुन्हयाच्या तपासात घटनास्थळावरून चोरट्याच्या हाताचे ठसे (चान्सप्रिंट) मिळाले होते. त्या चान्सप्रिंटचे ॲम्बिस प्रणालीव्दारे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर हे ठसे अट्टल चोर प्रज्वल गणेश वानखेडे (वय २६, रा श्रीकृष्णनगर, हुडको, छत्रपती संभाजीनगर) याचे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यास छत्रपती संभाजीनगरातून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी साडेचार तोळे सोने व १६० मिलीग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली. त्यास न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे यांच्या पथकाने केला.

पोलिस तपास आता नव्याने सुरू झालेल्या ॲम्बिस प्रणालीने बदलला गेला आहे. आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता फक्त फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून या सर्वांची डिजिटल पद्धतीने साठवणूक केली जाते. यासाठी अद्ययावत अशी ‘ॲम्बिस ‘ (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टिम) प्रणाली विकसित केली गेली आहे. या प्रकल्पांतर्गत पोलिस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली गेली आहे. ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडलेली असते. यामुळे हाताच्या ठशांचा डाटाबेसमध्ये शोध घेणे जलद गतीने शक्य झाले आहे. गुन्हे तपासातील सर्वोत्तम अशी ‘ॲम्बिस’ प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, येवला तालुक्यात या पद्धतीचा प्रथमच वापर करून गुन्हेगार जेरबंद करण्यात आला आहे.

हेही वापरा :

Back to top button