पिंपळनेर : वडीलांनी केला मद्यपी मुलाचा खून ; संशयीत पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

पिंपळनेर : वडीलांनी केला मद्यपी मुलाचा खून ; संशयीत पोलिसांच्या ताब्यात

पिपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

वारंवार होणाऱ्या त्रास व जाचाला कंटाळून पित्यानेच लाकडी धुपाटण्याने मद्यपी मुलाचा खून केल्याची घटना पिंपळनेरच्या पश्चिम पट्यातील बसरावळ गावात घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.

निमा रामा कुवर (४७, रा. पोस्ट उमरपाटा, ता. साक्री) यांनी पिंपळनेर पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा ईलमजी रामा कुवर (२८) हा सूरत येथे कामाला होता. त्याचे अधून मधून बसरावळ या गावी येणे जाणे होते. शिवाय दोन वेळा विवाह करुन मद्याच्या व्यसनामुळे दोन्ही वेळेस विवाह यशस्वी न झाल्याने त्याच्या दोन्ही पत्नी त्याच्याकडे राहिल्या नाहीत. मुलगा ईलमजी हा सुरतहून बसरावळला कधी कधी येत असल्याने ज्या कालावधीत तो वास्तव्यास असे त्या कालावधीत वडील रामा धुळ्या कुवर (५२) यांना मद्याच्या नशेत शिवीगाळ करत असे. त्याचप्रमाणे मंगळवार (दि.25) रोजी रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान मद्याच्या नशेत असताना वडीलांना शिवीगाळ करीत असताना ‘तुम्ही माझ्यासाठी काय कमवून ठेवले, मला काय दिले आहे’ असा वाद घालत जन्मदात्या पित्यालाच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या कारणावरुन मंगळवार (दि.25) रात्री ९ च्या दरम्यान बसरावळ गावाच्या शिवारातील शेतात रामा कुवर व त्यांचा मुलगा ईलमजी कुवर यांच्यातील वाद टोकाला गेला. मुलाच्या होणाऱ्या त्रासास कंटाळून वडील रामा कुवर यांनी लाकडी धुपाट्याने मुलगा ईलमजीच्या दोन्ही हातांवर, डाव्या डोळ्यावर, कानावर, तोंडावर व डोक्यावर जबर मारहाण केली. जबर मार बसल्याने मुलगा ईलम हा जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनास्थळी कुवर यांची नात अंकिता ही जवळच होती. तीने शेजारी राहणाऱ्या पास्टर जीवन देवल्या कुवर यांच्याकडे जावून सदरची घटना सांगितली. पास्टर यांनी ईलमची आई निमा कुवर यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी त्या सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथे कांदा खांडणीच्या कामी गेलेल्या होत्या. त्या घटनास्थळी दाखल होताच पोलीसात माहिती दिली. त्यानुसार रामा कुवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच साक्रीचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, जि. एम. मालचे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली. तसेच पंचनामा करून ईलमजीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी संशयीत रामा कुवर यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button