नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर | पुढारी

नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणावरील अनेक मिळकती राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खिशात घालत त्याचा गैरवापर सुरू केला आहे. काहींनी पोटभाडेकरू टाकले आहेत, काही ठिकाणी कोचिंग क्लासेस, जिम सुरू केले आहे. याबाबतचा तपशीलवार अहवाल आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्राप्त झाला असून, मनपा प्रशासन लवकरच शोधमोहीम राबवत या मिळकती ताब्यात घेणार आहे. या ठिकाणी गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल.

महापालिकेचे सहाही विभाग मिळून एक हजारांहून अधिक समाजमंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये आहेत. मनपाकडून आजी – माजी नगरसेवकांसह राजकीय पक्षसंघटना पदाधिकार्‍यांच्या मंडळांना नाममात्र दरात वापरासाठी त्या देण्यात आल्या. परंतु यातील अनेक मिळकतींचा गैरवापर सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्यानंतर मनपा प्रशासनाने खासगी संस्थेमार्फत स्वमालकीच्या मिळकतींचा शोध घेतला. हा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. राजकीय नेते अनेक मिळकतींचा खासगी मालमत्ता म्हणून सर्रास वापर करत आहेत. समाजमंदिराचा वापर गोदाम म्हणून केला जात आहे. अनेक ठिकाणी मोबाइल स्टोअर, कोचिंग क्लासेस, जिम, लग्न व सामाजिक कार्यासाठी वापर सुरू आहे. पोटभाडेकरू ठेवत राजकीय नेत्यांनी भाडे लाटण्याचे धंदे सुरू केल्याचे समोर आले आहे. या उद्योगांना लगाम लावण्यासाठी मनपा प्रशासन शोधमोहीम राबवत या मिळकती स्वत:च्या ताब्यात घेणार आहेत. त्यांचा लिलाव करून त्या माध्यमातून मनपाच्या उत्पन्नाला हातभार लावला जाणार आहे.

या अगोदर कागदावर कारवाई
तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांंनी हा मुद्दा उचलत सर्वेक्षण केले होते. त्यांच्या बदलीनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत फेरआढावा घेऊन कारवाईचे संकेत दिले होते. मात्र, याच कारवाईमुळे मुंढे यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांच्या बदलीनंतर ही कारवाई थंडी पडली. आता विद्यमान आयुक्तांनी याबाबत मोहीम उघडली असून, कारवाइचे आदेश दिले आहेत. गैरवापर प्रकरणी मनपाने दोन वर्षांपूर्वी काही लोकप्रतिनिधींंच्या ताब्यातील समाजमंदिराला मनपाने सील ठोकण्याची कारवाईही केली होती.

Back to top button