राज्यातील ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी | पुढारी

राज्यातील ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील ५८ तहसीलदारांना शासनाने उपजिल्हाधिकारीपदी बढती दिली आहे. बढती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे तत्कालीन तहसीलदार अनिल दाैंडे, येवल्याचे प्रमोद हिले व दीपक पाटील यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील ५४ नायब तहसीलदारांना शासनाने तहसीलदारपदी पदोन्नती दिली.

गेल्या आठवड्यात राज्याच्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये खांदेपालट करण्यात आली. या बदल्यांनंतर साऱ्यांच्याच नजरा या पदोन्नतीच्या आदेशाकडे लागल्या होत्या. शासनाने गुरुवारी (दि.२०) रात्री उशिराने तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहे. या आदेशात तहसीलदार दौंडे, हिले व पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठ तसेच तहसीलदार अर्चना खेतमाळीस या दोघांनाही बढती मिळाली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी नाशिक जिल्ह्यात काम केलेले आहे.

त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार स्वप्निल सोनवणे, निफाडचे दत्तात्रय जाधव, देवळ्याचे विजय बनसोडे तसेच दिंडोरीचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे या चौघांची शासनाने तहसीलदारपदी नियुक्ती केली आहे. सोनवणे यांच्याकडे सध्या त्र्यंबकेश्वर तहसीलदारपदाचा प्रभारी कार्यभार आहे. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्र्यरीत्या काढण्यात येणार असल्याचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पदोन्नती मिळाल्याच्या आनंदात असलेल्या अधिकाऱ्यांचे आता राज्यातील सहापैकी कोणत्या महसूल विभागात नियुक्ती मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

Back to top button