गारपिटीने भाजीपाला, पिके जमीनदोस्त | पुढारी

गारपिटीने भाजीपाला, पिके जमीनदोस्त

खडकवासला : अवकाळी पावसाने हवेली तालुक्यातील खडकवाडी, मांडवी, बहुली या भागांत ज्वारी पिकासह भाजीपाला, आंब्याचे मोठे नुकसान झाले. टोमॅटो, भेंडी, पावटा वाया गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, प्रशासनाने पंचनाम्याबाबत उदासीनता दाखवली आहे. या भागातील नुकसानीची प्रशासनाने अद्याप पाहणी केलेली नाही. याबाबत खडकवासला भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष नवनाथ तागुंदे म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. रविवारी (दि. 16) दुपारी झालेल्या गारपिटीने खडकवाडी, मांडवी खुर्द आदी ठिकाणची पिके, आंब्याचे नुकसान झाले. याची शासकीय यंत्रणेने पाहणी केलेली नाही.

याबाबत हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले की, दि. 15 पर्यंत झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. महसूल, कृषी व पंचायत विभागाकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले जात आहेत. मांडवी, खडकवाडी भागांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. मांडवी खुर्द येथील शेतकरी हभप विजय तनपुरे म्हणाले की, धरणतीरावरील तसेच परिसरातील तरकारी पिकांसह कांदा, भाजीपाला, ज्वारीसह फळबागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

 

Back to top button