नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन प्रकरण ; भुवन शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षिकेचेही निलंबन | पुढारी

नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन प्रकरण ; भुवन शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षिकेचेही निलंबन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विद्यार्थिनीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक राहुल सुरेश तायडे यांचे निलंबन केल्याची घटना ताजी असतानाच आता याच शाळेतील महिला अधीक्षिकेची गच्छंती करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन अधीक्षिका प्रियंका दीपक उके यांच्याविराेधात नाशिकचे प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. एकाच शाळेतील पुरूष-महिला अधिक्षक एकाचवेळी निलंबित झाल्याची पहिलीच घटना आहे.

आदिवासी विकास विभागाच्या भुवन येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील पुरूष अधीक्षक राहुल तायडे याने इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचे विशाखा समितीच्या चौकशीत समोर आले होते. तायडे हा वारंवार विद्यार्थीनी वस्तीगृहात येत असतानाही महिला अधीक्षिका उके यांनी त्याला मज्जाव न केल्याचे समितीच्या चौकशीत आढळले आहे. त्यातच आदिवासी विद्यार्थिनींच्या लैंगिक गैरवर्तनाचा गंभीर प्रकार असताना उके ह्या रजेवर गेल्याने त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राज्य कार्याध्यक्ष गणेश गवळी यांनी केली होती.

दरम्यान, अधीक्षिका उके यांच्या कर्तव्यशून्य कारभारामुळे पीडितेला लैगिंग गैरवर्तनासारख्या गंभीर घटनेला सामोरे जावे लागले. त्यामुळे उके यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कार्यवाहीची शिफारस समितीने केली होती. त्याआधारे नाशिकचे प्रकल्प अधिकारी रहमान यांनी उके यांचे निलंबन केले.

तायडेची विभागीय चौकशी सुरू

अधीक्षक राहूल सुरेश तायडे याने सन ३०१४-१५ मध्ये राजूर प्रकल्प कार्यालयात कार्यरत असतानाही आदिवासी विद्यार्थीनीसोबत गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी तायडेची विभागीय चौकशी सुरू आहे. त्यामुळे भुवन आश्रमशाळा प्रकरणातही प्रशासनाने तायडेविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे समजते.

हेही वाचा : 

Back to top button