Nandurbar : मोदींमुळे पंतप्रधान पदाची गरिमा खालावली ; प्रियंका गांधी यांची घणाघाती टीका | पुढारी

Nandurbar : मोदींमुळे पंतप्रधान पदाची गरिमा खालावली ; प्रियंका गांधी यांची घणाघाती टीका

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : मी शबरीचा पुजारी आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणतात. मग मणिपूर आणि अन्यत्र शेकडो आदिवासी महिलांवर अत्याचार झाले, त्यावेळी हे कुठे होते? असा प्रश्न करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला. “आतापर्यंत पंडित नेहरु, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्यासारख्या लोकांनी लोकशाहीचा आदर राखत पंतप्रधान पद सांभाळले. पण मोदींमुळे आज या पदाची गरीमा खालावली आहे”. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

महिलांवर अत्याचार होताना शबरीचे पुजारी काय करत होते?

नंदुरबार शहरातील शहादा बायपास येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस हॉस्पिटल समोरील मैदानावर शनिवारी (दि.11) ही जाहीर सभा पार पडली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि.10) नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांच्या पहिल्यांदाच होणाऱ्या सभेविषयी लोकांमध्ये उत्सुकता होती.

नंदुरबार येथील जाहीर सभेत बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कधीही आदिवासी देवतांचा आणि स्वातंत्र्यवीरांचा सन्मान केला नाही, अशी टीका केली होती. आपल्या ठोस शैलीत भाषण करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, पंतप्रधान मोदी काल नंदुरबारात येवून गेले आणि मी शबरीचा पुजारी आहे, असे सांगितले. मात्र, मणिपूरमध्ये एका महिलेला विवस्त्र करुन तिच्यावर अत्याचार केला जातो, तेव्हा शबरीचे पुजारी काय करत होते? मध्यप्रदेशात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करुन त्याचा व्हिडीओ व्हायरल केला गेला. कुठे ते राम ज्यांनी शबरीला सन्मान दिला आणि कोठे मोदी ज्यांनी शेकडो शबरींचा अपमान केला. (Nandurbar News)

हेमंत सोरेन हे एकमेव आदिवासी मुख्यमंत्री आहेत, पण त्यांना ऐन निवडणूकीच्या काळात जेलमध्ये टाकले. हा आदिवासींवर अन्याय, अत्याचार नाही तर काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. द्रौपदी मुर्मू त्यांच्या कर्तृत्वामुळे राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्या आहेत. पण त्यांच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन केले जात नाही. राम मंदिराचे उद्घाटन केले जात नाही. त्यामुळे एकीकडे आदिवासींच्या सन्मानाच्या गोष्टी केल्या जातात.

मोदी निवडणूकामध्ये रडून मते मागतात

पुढे बोलताना गांधी म्हणाल्या, मोदी हे निवडणूका आल्या की लहान मुलांसारखे रडून मते मागतात. त्यांनी हिंमत काय असते, ती इंदिराजींकडून शिकावी, ज्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, मोदी कधी आदिवासीच्या झोपडीत गेले नाही आणि स्वतःला शबरीचे पुजारी म्हणतात. यापुर्वी देशाची जी संपत्ती जमविली होती. ती धनदांडग्यांना विकण्यात आली आहे. परंतु, शेतकऱ्यांचे साधे कर्ज माफ केले जात नाही पण उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते. कोविड व्हॅक्सीन पूर्ण देशात पुरविणार्‍या कंपनीकडून ५२ कोटी घेतले, ज्यांच्याकडे छापे मारले त्यांच्याकडून पैसा घेतला गेला, ज्यांच्यावर केस दाखल होते, त्यांच्याकडून पैसा घेतला जातो मग केस दाबली जाते. ही या सरकारची सच्चाई आहे, असा आरोपही त्यांनी केला. (Nandurbar News)

गरीब कल्याण योजना लागू करणार ही आमची गॅरेंटी

काँग्रेस पुन्हा सत्तेत आले तर आम्ही पूर्ण देशात गरीब कल्याण योजना लागू करु ही आमची गॅरेंटी आहे. गरीब घरातील प्रत्येक मोठया महिलेच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये टाकले जातील. प्रत्येकाला नोकरी दिली जाईल, जीएसटी कर बंद करण्यात येईल, प्रत्येकाला किमान चारशे रुपये रोजाने १०० दिवसांचा खात्रीशीर रोजगार दिला जाईलच. आदिवासींसाठी विशेष अर्थसंकल्प तयार करु, भुमूीहिनांना जमीन देणार ज्या ठिकाणी आदिवासींची संख्या जास्त आहे ते क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करु. जेणेकरुन आदिवासींना त्यांच्या सवलती मिळतील. भुमिअधिग्रहण कायद्यात सुधारणा करु असे आश्‍वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा नेते माजी मंत्री के सी पाडवी, नंदुरबार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार शिरीष नाईक, प्रदेश उपाध्यक्ष कुणाल पाटील, नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक, पुनर्वसन संघर्ष समितीच्या नेत्या प्रतिभा शिंदे व अन्य उपस्थित होते. (Nandurbar News)

हेही वाचा :

Back to top button