रत्नागिरी : मनोरुग्णालयातील मुलीवर अत्याचार; शिपायास 20 वर्षे सश्रम कारावास | पुढारी

रत्नागिरी : मनोरुग्णालयातील मुलीवर अत्याचार; शिपायास 20 वर्षे सश्रम कारावास

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : येथील उपप्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणार्‍या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सलग 5 महिने अतिप्रसंग केल्याप्रकरणात तेथील शिपाई कर्मचार्‍याला न्यायालयाने मंगळवारी 20 वर्षे सश्रम कारावास आणि 31 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सचिन दिलीप माने (38, रा. मनोरुग्णालय वसाहत जेलरोड, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी कर्मचार्‍याचे नाव आहे.

यातील पीडित मुलगी बालकल्याण समितीच्या आदेशाने प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आली होती. तिची काळजी घेण्यासाठी तिच्या आईलाही दवाखान्यात तिच्यासोबत ठेवण्यात आले होेते. तेव्हा आरोपी सचिन माने याने पीडितेच्या आईशी ओळख वाढवून तिला मुद्दाम कुठेतरी गुंतवून ठेवत असे तसेच जेवण वगैरे आणायला जा, असे सांगून पीडितेवर वारंवार अतिप्रसंग करत होता.

दरम्यान, पीडितेने या बाबत आपल्या आईला सांगितल्यावर तिने जिल्हा बालकल्याण समितीकडे धाव घेतल्यावर जिल्हा बालकल्याण समितीने या बाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र दिले. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात सचिन माने विरोधात भादंवि कलम 376 2 (बी),पोक्सो 3/4(2),6 पोक्सो 11/12 आणि बाल न्याय अधिकनियमनुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी 14 साक्षिदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष पोक्सो न्यायाधिश वैजयंतीमाला ए. राऊत यांनी आरोपी सचिन मानेला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 31 हजार 500 रुपयांचा दंड तो न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.

Back to top button