नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी महाआरतीसाठी लवकरच समिती | पुढारी

नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी महाआरतीसाठी लवकरच समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाराणसीच्या धर्तीवर पंचवटीमधील रामकुंड येथे गंगा-गोदावरीची नियमितपणे महाआरती सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. महाआरतीच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी समिती गठीत करण्याच्या निर्णय सोमवारी (दि.१७) जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.

वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरी नदी महाआरतीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासनही त्यासाठी अनुकूल आहे. या माध्यमातून गोदावरी निर्मळ व अविरत वाहती राहावी तसेच पर्यटनवाढीला चालना मिळावी हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. शासनाने महाआरतीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून सूचना व अभिप्राय मागविले. त्या अनुषंगाने नूतन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्तिचरणदास महाराज, गंगा-गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गोदावरी महाआरतीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या प्रस्तावांमध्ये आरतीसाठीच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल. समितीत महापालिका, पोलिस, महावितरण, सार्वजनिक बांधकाम व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button