Amit Shah Dhule Sabha |…म्हणून राहुल, उद्धव राम मंदिराच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले; अमित शहांचा घणाघात | पुढारी

Amit Shah Dhule Sabha |...म्हणून राहुल, उद्धव राम मंदिराच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले; अमित शहांचा घणाघात

धुळे : पुढारी वृत्तसेवा-सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4000 करोड रुपयांची योजना आणली आहे. आचारसंहिता संपल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात हे 4000 करोड रुपये येतील, असे आश्वासन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुळ्यात दिले. विशिष्ट वोट बँक हातातून जाईल, या भीतीने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. पण आम्ही अशा कोणत्याही वोट बँक ची भिती बाळगत नसल्याचा टोला देखील यावेळी त्यांनी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान मोहीम यशस्वी केली. पण वीस वेळा ज्यांचं लॉन्चिंग फेल झालं, ते राहुल गांधी अशा मोहिमा करू शकणार नाही ,अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

धुळे येथील गोशाळेच्या मैदानावर आज महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री दादा भुसे, माजी मंत्री जयकुमार रावल, सटाणाचे आमदार बोरसे, आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, संजय शर्मा डॉ. तुषार शेवाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

काय म्हणाले अमित शहा ?

 त्यांना संगीत खुर्चीचा खेळ खेळावा लागेल : फडणवीस

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. देशाचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असून देश सुरक्षित राहील, अशा नेत्याला निवडण्यासाठी ही लोकसभा निवडणूक आहे. आज महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी, राज ठाकरे यांची मनसे ,रिपाई, रासपा असे पक्ष महायुतीत आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्याकडे देखील 30 ते 40 पक्ष आहेत. मात्र महायुतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तर इंडिया आघाडीचे पंतप्रधान कोण, हे त्यांनी स्पष्ट करावे. या संदर्भात दररोज सकाळी नऊ वाजेला पोपटलाल हे बोलत असतात. पाच वर्षात ते पाच पंतप्रधान करणार आहेत. पण या पाच पंतप्रधानांची निवड करण्यासाठी त्यांना संगीत खुर्चीचा खेळ खेळावा लागेल. सत्तेच्या या खुर्ची भोवती फिरून जो बसेल तो पंतप्रधान, अशी त्यांची अवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन केले. या जिल्ह्यांमध्ये अक्कलपाडा प्रकल्पाच्या तीस वर्ष रखडलेले काम पूर्ण केले. त्यासाठी आमच्या सरकारने 170 कोटी रुपये दिले. सुरवाडे योजनेसाठी देखील 2700 कोटी रुपये दिले. त्यामुळे हा जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम वाहिन्या असणाऱ्या नद्या पूर्वेकडे आणण्याची महत्वकांशी योजना राबवली जाईल. यातून मराठवाडा, खानदेश हा भाग सुजलाम सुफलाम होणार आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसवाले लोकसभा निवडणुकी संदर्भात वोट जिहाद करण्याची भाषा करत आहेत. तर आम्ही देखील मतांचा यज्ञ करणार असून त्यात एक एका मतांची आहुती मोदींना दिली जाईल ,असा निर्धार करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

70 वर्ष काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्न अधांतरीत ठेवला

त्यानंतर बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी खानदेशचे कुलदैवत एकविरा देवी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीर सावरकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे वीर सावरकर यांचे नाव देखील घेत नाही ,असा टोला लावला. तर चौथ्या टप्प्यात देशभरात मतदान सुरू असून या मतदात्यांनी देश सुरक्षित ठेवणाऱ्या सरकारला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशात या निवडणुकीत एका बाजूला बारा लाख करोड रुपयाचा घपला करणारी काँग्रेस आणि त्यांचे साथी असून दुसऱ्या बाजूला 23 वर्षापर्यंत मुख्यमंत्री पदावर असून देखील 25 पैशाचा देखील गैरव्यवहार न करणारे मोदी आहेत. या देशात उष्णता वाढल्यानंतर बँकॉकला सहलीसाठी जाणारे राहुल गांधी आहेत. तर दुसऱ्या बाजूला घरी कोणतीही दिवाळी साजरी न करता देशाच्या सरहद्दीवर देश रक्षण करणाऱ्या सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करणारे नरेंद्र मोदी आहेत. चांदीचा चमचा सोबत घेऊन आलेले राहुल एका बाजूला आहेत. तर चहा विकणाऱ्या गरीब परिवारातून देश रक्षण करणारे नरेंद्र मोदी हे दुसऱ्या बाजूला आहे .अशा दोघांमध्ये ही निवडणूक सुरू आहे. अयोध्या मधील राम मंदिर हे शेकडो वर्षांपूर्वीच बनले पाहिजे होते. मात्र 70 वर्षांपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राम मंदिराचा प्रश्न अधांतरीत ठेवला .हा प्रश्न न्यायालयात अडकवून ठेवला गेला. पण नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात न्यायालयातील दावा जिंकून भूमिपूजन करून या मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करून जय श्रीराम ची घोषणा केली. काँग्रेसचे नेता राहुल गांधी आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण दिले गेले. मात्र ते का आले नाही, याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे. एक विशिष्ट वोट बँक आपल्या हातातून जाईल, अशी त्यांना भीती वाटली. म्हणून ते सोहळ्यात आले नाही. पण आम्हाला अशा कोणत्याही वोट बँकेची भीती वाटत नाही ,असे शहा यांनी सांगितले .

केवळ राम मंदिरच नव्हे तर मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोर बनवला. या पुढे देखील सर्व श्रद्धा केंद्रांची पुनरोद्धार केला जाणार आहे. देश सुरक्षित करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले ,असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राजस्थान व महाराष्ट्राचा काश्मीर शी काय संबंध असे म्हणतात.पण या धुळे शहराचा बच्चा- बच्चा काश्मीरसाठी बलिदान देऊ शकेल, असे सांगताना शहा यांनी काँग्रेसने 370 कलम सांभाळून ठेवून तुष्टिकरणचे राजकारण केले. पण नऊ ऑगस्ट 2019 रोजी 370 कलम नष्ट करून मोदी यांनी काश्मीरच्या आकाशात तिरंगा झेंडा फडकवला .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद संपवला .त्यांनी पाकिस्तानच्या धरतीवर जाऊन सर्जिकल स्ट्राइक केले .अशा पद्धतीने राहुल गांधी हे देश सुरक्षित करू शकतात का ,असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

मोदींनी भारत पाचव्या क्रमांकावर आणला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात अर्थतंत्र मजबूत करून 11 नंबर वर असणारा भारत पाचव्या क्रमांकावर आणला. भविष्यात अर्थतंत्र आणखी मजबूत करून तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे काम केले जाणार आहे. सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील नवीन योजना आणली आहे. यासाठी चार हजार कोटी रुपये उपलब्ध असून आचारसंहिता संपल्या बरोबर बँकेत हा पैसा येणार आहे. केंद्रातील सरकारने महाराष्ट्राला विकासासाठी 15 लाख करोड रुपये पाठवले आहेत. पण मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी काय काम केले, याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तर हिंदुत्ववादाचा सिद्धांत सोडणारे उद्धव ठाकरे यांनी जनतेला पाच प्रश्नांची उत्तर दिले पाहिजे. दहशतवादी कसाबच्या समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे. तसेच मुस्लिम पर्सनल लॉ परत आणण्याची भाषा करणाऱ्या संदर्भात त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. सनातनच्या विरोधात बोलणारे स्टलिंन यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची काय भूमिका आहे, हे देखील स्पष्ट करावे असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –

Back to top button