नाशिक : निफाड तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा | पुढारी

नाशिक : निफाड तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ निफाड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

हा मोर्चा निफाड बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, अन्यायकारक कारवाई थांबवावी, एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवावी, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणू नये आदी घोषणा देत निफाड तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. गळ्यात कांदा, द्राक्षांच्या माळा घालून उपोषणाला प्रारंभ केला. याप्रसंगी सुधाकर मोगल, दत्तात्रेय सुडके आदींनी जिल्हा बँक व शासनाच्या धोरणावर टीका केली. राज्य शासनाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला शेतकरी कर्जमुक्तीसाठी विशेष पॅकेज दिले पाहिजे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सहायक निबंधक यांच्यामार्फत होणारी सक्तीची वसुली व कारवाईनुसार सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याची प्रक्रिया थांबवावी. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ६२ हजार शेतकरी थकबाकीदार असून त्यांच्या जमिनीचे लिलाव नाशिक जिल्हा बॅंक करत आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतजमिनीची लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली, त्याच धर्तीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतजमिनीचे लिलाव थांबवावे आदी मागण्या शेतकरी समन्वय समिती व शेतकरी संघर्ष संघटना यांच्यामार्फत करण्यात आल्या. यावेळी भगवान बोराडे, तुषार गांगुर्डे, नाना पथाडे, विनायक घोलप, उमाकांत शिंदे, मोतीराम पानगव्हाणे, प्रभाकर मापारी, राजेंद्र आहेर, केशवराव पानगव्हाणे, शिवाजी वाबळे, प्रकाश मापारी, नंदू चव्हाण, संजय वाबळे, अब्दुल शेख, संजय पाटोळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button