कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ : केंद्र सरकार ॲक्‍शन मोडमध्‍ये, उद्या आरोग्‍यमंत्र्यांची बैठक | पुढारी

कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ : केंद्र सरकार ॲक्‍शन मोडमध्‍ये, उद्या आरोग्‍यमंत्र्यांची बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील विविध राज्‍यांमध्‍ये कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत आहे. मागील दोन दिवसांमध्‍ये नवीन कारोना रुग्‍णसंख्‍येत ८० टक्‍के वाढ झाल्‍याचे चित्र आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. तसेच केंद्रीय आरोग्‍य मंत्री मनसुख मांडविया शुक्रवार ७ एप्रिल रोजी सर्व राज्‍यातील आरोग्‍य मंत्र्याबरोबर बैठक घेणार आहेत. ही बैठक व्‍हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्‍या माध्‍यमातून होणार आहे. या बैठकीत देशातील सर्व राज्‍यातील कोरोना परिस्‍थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

देशातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ५ हजारांवर

देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,३३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २५,५८७ वर पोहोचली असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे. (Covid-19 updates)
काल बुधवारी देशात ४,४३५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर ११ जणांचा मृत्यू झाला होता. कोरोनाची ही रुग्णवाढ ६ महिन्यांतील सर्वांधिक आहे. आठवड्याच्या आत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. बुधवारी कोरोनाने महाराष्ट्रातील ४ जणांचा बळी घेतला. तर दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पाँडेचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या २४ सप्टेंबरनंतरची ही सर्वांधिक दैनंदिन रुग्णसंख्या वाढ आहे.

बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे

कोरोना रुग्‍णवाढीबाबत माहिती देताना दि इंडियन सार्स कोव्ह २ जिनोमिक्स कन्सोर्टिम (INSACOG) अर्थात बायोटेक्नॉलॉजी विभागाने सांगितले की, कोरोना विषाणूचे नवीन स्‍वरुप देशातील ३८ टक्‍के संसर्ग प्रसारासाठी जबाबदार आहे. यासंदर्भात INSACOG ने आपाला अहवाल आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत सादर केला.
INSACOG च्या मते, कोरोनाचा विषाणूचा एक नवीन प्रकार हा XBB.1.16, भारताच्या विविध भागांमध्ये आढळून आला आहे, आजपर्यंत याचे ३८.२ टक्‍के संक्रमण प्रमाण होते. देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग वेगाने वाढला आहे, बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. मात्र ज्या लोकांना आधीच इतर आजार आहेत, त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे निश्चितपणे मध्यम ते गंभीर स्थितीत नोंदवली जात आहेत.

हेही वाचा :

 

 

Back to top button