नाशिक शहराचे जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण, आता एका क्लिकवर मिळणार माहिती | पुढारी

नाशिक शहराचे जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण, आता एका क्लिकवर मिळणार माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहराशी संबंधित तसेच महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत आणि मूलभूत सेवा सुविधा आणि प्रकल्पांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका शहराचे ड्रोनव्दारे जीआयएस मॅपिंग करत असून, हे काम पूर्ण झाले आहे. सध्या या मॅपिंगची मनपाच्या अभियंत्यांकडून पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच हे मॅपिंग अंतिम केले जाणार आहे.

नाशिक शहराचे ड्रोन सर्वेक्षण करून जीआयएसमध्ये मॅपिंग करण्यासाठी महापालिकेने एका खासगी कंपनीची नियुक्ती केली होती. जवळपास दोन वर्षांपासून हे कामकाज सुरू होते. संपूर्ण नाशिक शहराचे हाय रिसोल्युशन ड्रोन इमेजच्या सहाय्याने एरियल सर्वेक्षण करून जीआयएसमध्ये मॅपिंग करण्यात आले आहे. या मॅपिंगमुळे शहरातील अस्तित्वातील असलेले सर्व पाणी, सांडपाणी, विद्युत, गॅसवाहिनी, उद्याने, आरक्षणे, नद्यानाले, बस व रेल्वेस्थानक, अनधिकृत बांधकामे अशा प्रकारची माहिती एकाच वेळी अगदी अचूकपणे गोळा करणे अगदी सहज शक्य होणार आहे. ही संकलित झालेली माहिती संंबंधित पायाभूत तसेच मूलभूत सेवा सुविधांची संरचना करण्यावेळी उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर त्या-त्या कामांचे विश्लेषण करणे व ते मॅपमध्ये दर्शविल्यामुळे भविष्यामध्ये नाशिक शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने माहिती उपयुक्त ठरणार आहे. तसेच शहराचा विस्तार होत असताना नवीन अभियांत्रिकी प्रकल्प हाती घेतल्यास त्याकरता या माहितीचा उपयोग होणार आहे.

नागरिकांनाही होणार फायदा

जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून संकलित केल्या जाणाऱ्या माहितीचा उपयोग महापालिकेलाच नव्हे, तर नागरिकांना तसेच शहरात राबविण्यात येणाऱ्या अनेक खासगी वा इतर आस्थापनांचे प्रकल्प उभारतानादेखील होणार आहे. यामुळे झालेले मॅपिंग हे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

संरक्षण क्षेत्रांना वगळले

या मॅपिंगच्या कक्षेतून आर्टिलरी सेंटर व त्यांची हद्द, बोरगड आणि महाराष्ट्र पोलिस अकादमी अशा सर्वच अंतिसंवेदनशील व संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना वगळण्यात आले आहे

हेही वाचा :

Back to top button