सात्रळ : कामे आम्ही करतो, श्रेय विरोधक घेतात : आ. तनपुरे | पुढारी

सात्रळ : कामे आम्ही करतो, श्रेय विरोधक घेतात : आ. तनपुरे

सात्रळ; पुढारी वृत्तसेवा : सध्याचा काळ असा चालू आहे की, एकाच कामाचे दोन उद्घाटने होत आहेत. कामे आम्ही करतो व फुकटचे श्रेय खासदार व माजी आमदार घेतात, असे टीकास्त्र आ. प्राजक्त तनपुरे यांनी सोडले. जलजीवन मिशन अंतर्गत राहुरी तालुक्यातील गुहा येथे आ. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते 1.76 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसह 15 व्या वित्त आयोगाच्या 46 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ पार पडला. यावेळी आ. तनपुरे बोलत होते.

आ. तनपुरे म्हणाले, सध्या राज्यामध्ये खालच्या पातळीवर जाऊन राजकारण सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेबद्दल जो निर्णय दिला तो आश्चर्यकारक आहे. सध्याच्या सरकारमधील बरेच आमदार मंत्रीपदावरुन नाराज आहेत. त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगत लवकरच आपले सरकार येण्याची चिन्हे दिसतात, असे आ. तनपुरे म्हणाले.

यावेळी प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे अध्यक्षस्थानावरून म्हणाले, ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यापासून गुहा गावाचे विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिलेल्या विकास निधीबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी मनीषा ओहोळ, अशोक उर्‍हे, सरपंच उषाताई चंद्रे, सुजित वाबळे, किरण कोळसे, बापू कोबरणे, प्रणव कोळसे, रघुनाथ मुसमाडे, संजय शिंदे, रवींद्र शिंदे, शरद वाबळे, रामा बर्डे, मेजर कोळसे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बॅकलॉग भरून काढायचे काम सुरू
चारीची कामे आम्ही करतो, मात्र बटन दाबायला खासदार व माजी आमदार येतात, ही हास्यास्पद गोष्ट आहे. मागील दहा वर्षांत आपल्या तालुक्याची हाणी झाली. तो बॅकलॉग भरून काढायचे काम आपण चालू केले, असे आ. तनपुरे म्हणाले.

Back to top button