नाशिक : ‘पदवीधर’च्या प्रचारतोफा आज थंडावणार, सोमवारी मतदान | पुढारी

नाशिक : 'पदवीधर'च्या प्रचारतोफा आज थंडावणार, सोमवारी मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाकरिता जाहीर प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि.२८) सायंकाळी ५ ला थंडावणार आहेत. येत्या सोमवारी (दि.३०) विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी जोर लावल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक पदवीधरची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. यंदाच्या निवडणुकीत १६ उमेदवार नशीब आजमावत असले तरी राष्ट्रीय पक्षांचा एकही अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे ही निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मागील १५ दिवसांपासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे विभागातील पाचही जिल्हे पिंजून काढले आहेत. यावेळी उमेदवारांकडून पदवीधर मतदारांसह विविध संघटनांकडे मतांचा जोगावा मागितला आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या दिवसापासून ४८ तास अगोदर जाहीर प्रचार बंद केला जातो. त्यानुसार येत्या सोमवारी (दि.३०) पाचही जिल्ह्यांतील ३३८ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायं. ४ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. नियमानुसार शनिवारी (दि.२८) सायंकाळनंतर जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत.

कर्मचारी उद्या होणार रवाना

विभागातील पाचही जिल्ह्यांतील मतदान केंद्राधिकारी व कर्मचारी हे रविवारी (दि.३०) दुपारी मतपेट्या तसेच मतदान साहित्यासह केंद्राकडे रवाना होणार आहेत. तत्पूर्वी, कर्मचाऱ्यांना अखेरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात ९९ मतदान केंद्रे असून, सय्यद पिंप्री येथील जिल्हा निवडणूक शाखेच्या गोदामातून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होतील.

हेही वाचा : 

Back to top button