नगर : सत्यजितने उमेदवारीच मागितली नाही ; नाना पटोले यांचा तांबेंवर पलटवार | पुढारी

नगर : सत्यजितने उमेदवारीच मागितली नाही ; नाना पटोले यांचा तांबेंवर पलटवार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. सत्यजित तांबे यांनी उमेदवारीची मागणी केली नव्हती. तरीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने उमेदवारीसाठी दोन कोरे एबी फार्म दिले होते. त्यामुळे आता तांबे यांनी काँग्रेस पक्षाला दोष देऊ नये, आरोपीच्या पिंजर्‍यात  उभे करू नये, असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी निलंबनाची कारवाई दुर्दैवी म्हणणारे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर केला.

नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आज नगर दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेबाबत विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची भूमिका अद्याप पुढे आलेली नसली तरी ते काँग्रेस सोबत आहेत. उलट भाजपला नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवार मिळाला नाही असे सांगून ते म्हणाले, पदवीधर निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले या सगळ्या नेत्यांची चर्चा झाली होती.

त्यात डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचे ठरले. त्यावेळी डॉ. सुधीर तांबे म्हणाले असते उमेदवारी मला नको मुलाला द्या. त्यावर पक्षाने नक्कीच विचार केला असता. पक्षाकडून काही चुकलेले नाही. घरामध्ये वाद चालू आहे हे पक्षाला कसे कळणार आहे. तो वाद पक्षासमोर आला असता तर सोडविला असता. तरीही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाने दोन कोरे एबी फॉर्म पाठविले होते. त्यादिवशी डॉ. सुधीर तांबे यांच्याशी बोलणे ही झाले होते. फॉर्म भरून घ्या 16 तारखेपर्यंत हायकमांडचा आदेश घेऊन पुढील दिशा ठरू. त्यानंतर ते दोघे एकत्र फॉर्म भरण्यास गेले. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाला आता दोष देऊ नये.

त्या निर्णयाचे स्वागत करावे लागले

भाजपने ऑनलाईन बैठक घेऊन पदवीधर मतदारसंघामध्ये सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याची चर्चा असल्याकडे पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, भाजपने तांबे यांना पाठिंबा दिल्याचे आपल्याला माहिती नाही. तसे असल्यास अखेर संयम खरा ठरला. भाजपच्या निर्णयाचे स्वागत करावे लागले.

12 तारखेला नेमके काय झाले

डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी न घेता सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर काँग्रेसने डॉ. तांबे पिता-पुत्राला काँग्रेसमधून निलंबित केले. त्यावर बोलताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, 12 जानेवारीला डॉ. सुधीर तांबे यांच्याशी बोलणे झाले होते ते मी आता सांगणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे 12 जानेवारीला नेमके काय बोलणे झाले होते याची चर्चा सुरू झाली.

Back to top button