पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कामावर ताशेरे | पुढारी

पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कामावर ताशेरे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेट्रो प्रकल्पाचा आराखडा मंजूर झाल्यानंतरही महापालिकेच्या विद्युत विभागाने नियोजित मेट्रो मार्गाच्या रस्त्यावर महागडे विद्युत पोल उभे करून 76 लाख 71 हजार रुपयांची उधळपट्टी केली आहे, असा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाने सप्टेंबर 2016 मध्ये येरवडा पूल ते जहांगीर हॉस्पिटल या दरम्यानच्या बंडगार्डन रस्त्यावर महागडे विद्युत पोल आणि फिटिंग्ज बसविण्याची निविदा काढली होती. ऑक्टोबरमध्ये ही निविदा उघडण्यात आली.

या कामाची वर्कऑर्डर 17 डिसेंबर 2016 मध्ये दिली. अवघ्या दोन महिन्यांत करायच्या या कामाची रनिंग बिले मात्र फेब्रुवारी 2017 पासून मार्च 2018 मध्ये देण्यात आली. दरम्यान, वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रोचा मार्गांचा आराखडा मान्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 नोव्हेंबर 2016 रोजी भूमिपूजन झाले. त्यानंतर हे काम करत असताना या मार्गिकेवर बसविण्यात आलेले सर्व पोल काढण्यात आले.

त्यानंतर लेखापरीक्षकांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत विद्युत पोलसंदर्भात खुलासा मागविला. यावर महापालिकेच्या विद्युत विभागाने उत्तर दिले. या मार्गावर व्हीआयपी वाहतूक असल्याने आकर्षक महागड्या फिटिंग्ज बसविण्यात आल्या. तसेच मेट्रो जमिनीखालून होणार की जमिनीवरून होणार याची माहिती नसल्याने हे काम करण्यात आल्याचे लेखी स्पष्टीकरण पाठविले. लेखापरीक्षकांनी हे स्पष्टीकरण फेटाळताना मेट्रो प्रकल्पाचा आराखडा मंजुरीनंतरही महापालिकेने 76 लाख 71 हजार रुपयांची उधळपट्टी केल्याचा ठपका ठेवला आहे.

Back to top button