कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन | पुढारी

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले.  ते 75 वर्षाचे होते.  गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान काल त्यांना ह्दय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे घराणे होते. युवक काँग्रेस पासून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.  पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली. तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. नाशिकमध्येही त्यांचा राजकीय दबदबा होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. बुधवारी (दि. 11) नाशिकच्या काँग्रेस कमिटी (कार्यालय) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता नाशिक अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Back to top button