Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त | पुढारी

Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून सहा लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रिजवान मलंग शहा (२३, रा. कुरेशीनगर, वडाळानाका) असे पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला होता. पोलिसांनी त्याची देहयष्टी, चालण्याची शैली, कपडे व शुज या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला. त्यानुसार पोलिसांनी रिजवान यास पकडले. त्याच्याकडील चौकशीत त्याने चार घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच घरफोडीत लंपास केलेले सुमारे तेरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईनाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील रोहोकले, चंद्रकांत अहिरे, सहायक निरीक्षक के. टी. रोंदळे, सोमनाथ गेंगजे, अंमलदार आर. व्ही. सोनार, समीर शेख, आप्पा पानवळ, विश्वास साळुंखे, राजेंद्र नाकोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराजवळ सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button