नाशिक : आशासेविकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला | पुढारी

नाशिक : आशासेविकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे गावाजवळ वावी रस्त्याला असणार्‍या आशासेविका हेमलता सुनील कासार यांच्या घरावर मंगळवारी (दि.6) भरदुपारी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच खोपडी येथील आशासेविका वनिता अनिल गडाख यांच्या घरातील 60 हजार रोख तर काही सोन्याचे दागिने लंपास करून चोरटे फरार झाले.

मंगळवारी वावी येथे आठवडे बाजार असल्याने हेमलता कासार या बाजारसाठी आल्या होत्या. विकास सोसायटीचे सचिव त्यांचे पती सुनील कासार हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा रस्त्यालगत असणार्‍या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यांचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे विविध दागिने तसेच रोख 15 हजार रुपये घेऊन चोरटे फरार झाले. दरम्यान, खोपडी येथे वडांगळी रस्त्यालगत असणार्‍या आशासेविका वनिता गडाख यांच्याही घरावर मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरामधील रोख साठ हजार रुपये, लहान मुलांची सोन्या-चांदीची दागिने, देवघरातील चांदीचे देव असा सुमारे एक लाखांचा ऐवज लंपास केला. गडाख कुटुंबीय शेतात कामानिमित्त गेले होते. कासार यांनी वावी पोलिसात तर गडाख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. दोन्ही घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

चोरट्यांचे धाडस वाढल्याने चिंता
वावी येथे आठवडे बाजारातून ग्राहकांचे चार ते पाच मोबाइल चोरीस गेल्याने बाजारातही एकच खळबळ उडाली होती. भरदिवसा रस्त्यालगत घरफोड्या करण्याचे धाडस चोरटे करतात कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा:

Back to top button