वाळकीच्या सरपंचपदासाठी चुरस !

वाळकीच्या सरपंचपदासाठी चुरस !
Published on
Updated on

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यात वाळकीच्या सरपंच पदाच्या तिरंगी लढत होणार असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. सदस्य पदासाठीच्या 17 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. थेट जनतेतून निवड होणार्‍या वाळकीच्या सरपंचपदासाठी माजी उपसभापती रंगनाथ निमसे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद बोठे, राम भालसिंग एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत . वाळकी ग्रामपंचायतीवर दहा वर्षांपासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोठे यांचे वर्चस्व आहे.बोठे यांच्या वर्चस्वाला शह देऊन दहा वर्षांची सत्ता उलथून टाकण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत.

माजी उपसभापती रंगनाथ निमसे, धर्मराज शैक्षाणिक संस्थेचे संस्थापक एन. डी. कासार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य संभाजी कासार, ज्येेष्ठ नेते महादेव कासार, शिवसेनेचे अप्पासाहेब भालसिंग, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुहास कासार आदींनी बोठेंच्या विरोधात वज्रमूठ आवळली आहे. वाळकीत सरपंच पदासाठी रंगनाथ निमसे आणि शरद बोठे यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची शक्यता असतानाच राम भालसिंग यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी करीत निवडणूकीत चुरस निर्माण केली आहे. राम भालसिंग यांच्या उमेदवाराने दोन्ही उमेदवारांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

ग्रामपंचायत सदस्य पदासाठी मात्र भाऊसाहेब बोठे यांच्या पॅनल विरोधात रंगनाथ निमसे यांचा सर्वपक्षीय पॅनलमध्ये समोरासमोर लढत रंगणार आहे. प्रभाग 4 मध्ये राम भालसिंग यांनी सदस्य पदासाठीही उमेदवारी केली असून प्रभाग क्रमांक 5 मधून त्यांच्या पत्नी सुधाराणी भालसिंग निवडणूक रणांगणात उतरल्या आहेत. त्यामुळे सदस्य पदाच्या 17 जागांसाठी 36 उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. वाळकीत सरपंच पदासाठी रंगणारा तिरंगी सामना तालुक्यात लक्षवेधी ठरणार आहे .

तिरंगी लढतीचा फायदा कोणाला?

मागील वेळी सरपंच पदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत झाली होती. पंचरंगी लढतीचा फायदा बोठे गटाला होऊन स्वाती बोठे जनतेतून पहिल्या सरपंच ठरल्या होत्या. यावेळी मात्र बोठेंच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. बोठे गटाच्या वतीने सरपंच पदासाठी शरद बोठे उमेदवारी करत असून, त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून रंगनाथ निमसे रंगणात उतरले आहेत . राम भालसिंग यांनीही सरपंच पदासाठी उमेदवारी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news