नाशिक : बँक कॅशियरच्या काउंटरवरून 17 लाख केले लंपास, गर्दीचा उठविला फायदा | पुढारी

नाशिक : बँक कॅशियरच्या काउंटरवरून 17 लाख केले लंपास, गर्दीचा उठविला फायदा

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
स्टेट बँकेच्या पंचवटीतील पेठ फाटा येथील स्टेट बँकेच्या कॅशियरने त्याच्या टेबलवर ठेवलेल्या 50 लाखांपैकी 17 लाख रुपयांची नोटांची बंडले चोरट्याने गर्दीचा फायदा उठवत चोरून नेल्याची धक्कादायक घटना स्टेट बँकेच्या पेठ फाटा शाखेत दुपारी घडली. ग्राहक बनून आलेल्या भामट्याने बँकेतील कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधून चक्क पिशवीत बंडले भरत बँकेच्या पैशांवर डल्ला मारला.

भारतीय स्टेट बँकेचे प्रबंधक युवराज दौलत चौधरी (रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) यांनी पंचवटी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, स्टेट बँकेच्या पेठ फाटा शाखेत बुधवारी (दि. 2) शाखेचे कॅशियर राजेंद्र बोडके यांनी कॅश काउंटरवर जमा झालेली 50 ते 55 लाख रुपयांची रोख रक्कम मोजून त्यांच्या शेजारच्या टेबलावर ठेवलेली होती. दुपारी दीडच्या सुमारास बँकेत ग्राहक बनून आलेला भामटा बँकेच्या परिसरात रेंगाळत होता. बँकेतील कर्मचारी दुपारी आपापल्या कामात गुंग असताना भामट्याने बोडके यांनी काढून ठेवलेल्या रोकडपैकी 17 लाख रुपयांची बंडले पिशवीत टाकून बँकेतून पळ काढला. नंतर बंडले पुन्हा मोजताना हिशेब लागत नसल्याने सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक भामटा बंडले पिशवीत टाकून निघून गेल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्याचा तपास सुरू केला आहे.

सुरक्षाव्यवस्था भेदली
पेठ फाटा येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कडक सुरक्षाव्यवस्था असते. सामान्य ग्राहकाला बँकेत काही काम अथवा साधी चौकशी करायची असेल तर बँकेच्या नियमबद्ध व्यवस्थेला सामोरे जावे लागते. असे असतानाही संशयित आतमध्ये जाऊन रोकड लंपास करून पसार झाला.

हेही वाचा :

Back to top button