सातारा : कराडमध्ये मगरीचा पोहणाऱ्या व्यक्‍तीवर हल्‍ला | पुढारी

सातारा : कराडमध्ये मगरीचा पोहणाऱ्या व्यक्‍तीवर हल्‍ला

कराड; पुढारी वृत्तसेवा येथील कृष्णा कोयना नदीच्या संगमावर नदीमध्ये पोहरणाऱ्या मधुकर लक्ष्मण थोरात यांच्यावर मगरीने हल्ला केला. यामध्ये थोरात हे जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी घडली. या हल्‍ल्‍यात त्‍यांच्या पायाला जखम झाली आहे. दरम्‍यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कराड येथील कृष्णा नदीत रोज सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक पोहायला येत असतात. रोज पोहणारे तीन मोठे ग्रुप आहेत. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुमारे तीस जणांचा एक ग्रुप या ठिकाणी पोहायला गेलेला होता. पोहणारे तीन-चार लोक नदीच्या आत बरोबर मध्यभागी गेले असता, यामधील मधुकर थोरात यांच्या पायाला कोणीतरी ओढत असल्याची त्‍यांना जाणीव झाली. यावेळी त्यांनी पाहिले असता मगरीने त्यांच्या पायाला तोंडात पकडले असल्‍याचे त्‍यांना दिसले. यामुळे ते घाबरले. त्‍यांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली.

त्‍यामुळे त्‍यांचे इतर दोन मित्र जवळ आले. त्यांनी मधुकर थोरात यांना नदीतून बाहेर काढले. त्यांना सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर कृष्णा नदीमध्ये पोहायला येणाऱ्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोहायला येणारे अनेक लोक या घटनेमुळे नदीकाठी थांबले होते.

हेही वाचा :  

Back to top button