नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन | पुढारी

नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी समाजातील नागरिकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले आमदार जयकुमार रावल यांना अटक करत त्यांना निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१) मुंबईच्या आझाद मैदानावर आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आ. रावल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपुर्ण परिसर दणाणून सोडला.

दोंडाईचा सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी दसरा या सणाच्या दिवशी आदिवासी भिल्ल समाज बांधवांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसूचित प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, रावल आणि त्यांच्या साथीदारांना अटक झालेली नाही. त्यामुळे आ. रावल यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश देऊन त्यांचे निलंबन करावे. अशी मागणी आदिवासी समाजाकडून केली जात आहे. दरम्यान, आ. रावल यांच्या निलंबन व अटकेच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठविण्यात आले आहे. आंदोलनात परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव, संदीप गवारी, नीलेश माळी, निशांत चंद्रमोरे, राजू लंगडे आदींसह राज्यभरातील आदिवासी समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा:

Back to top button