आंदोलन इफेक्ट : बकर्‍या मागणार्‍या विद्यार्थ्यांना जि. प. प्रशासनाने दिल्या सायकली | पुढारी

आंदोलन इफेक्ट : बकर्‍या मागणार्‍या विद्यार्थ्यांना जि. प. प्रशासनाने दिल्या सायकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’ अशा घोषणा देत थेट जिल्हा परिषदेसमोर अनोखे आंदोलन करणार्‍या त्या 43 विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असून, या विद्यार्थ्यांना चार शाळांचेही पर्याय दिले आहेत.

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र शाळेत हलविले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने ‘दप्तर घ्या, बकरे द्या’ असे अनोखे आंदोलन करण्यात आले होते. त्याची गंभीर दखल सीईओ आमिषा मित्तल यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या चार शाळांचे पर्याय उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना मानव विकास योजनेतून सायकल सुविधाही देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. प्रशासनाने सांगितल्यानुसार मूळच्या दरेवाडी शाळेत दाखल असलेले 43 विद्यार्थी दरेवाडी किंवा जवळच्या शाळेत जाण्यास इच्छुक नसल्याने, तत्कालीन परिस्थितीत त्यांच्यासाठी वस्तीमधील पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अध्यापनाची सोय केलेली होती. या पत्र्याच्या शेडमध्ये अनुकूल वातावरण नाही तसेच विद्यार्थी सुरक्षेचा धोका आहे. त्यामुळे, प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे जवळच्या चार शाळांमध्ये समायोजन करण्याची तयारी केली असून, या सर्व विद्यार्थ्यांना सायकल सुविधा देण्यात येणार आहे.

असे आहेत पर्याय :

1. ज्या वस्तीतील नागरिक व विद्यार्थ्यांनी शाळेची मागणी केली आहे. त्या वस्तीच्या मध्यापासून दक्षिणेकडे न्यू इंग्लिश स्कूल काळुस्ते, ता. इगतपुरी ही इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वीची शाळा डांबरी पक्क्या रस्त्याने 500 मीटर तसेच खडीकरण रस्त्याने 300 मीटर अंतरावर आहे.
2. जि. प. प्राथमिक शाळा काळुस्ते इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वीची शाळा डांबरी पक्क्या रस्त्याने 800 मीटर तसेच नजीकच्या रस्त्याने 600 मीटर अंतरावर आहे.
3. भाम धरणवस्तीच्या उत्तरेकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारुक्तेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरवज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरपण या डांबरी रस्त्याने 1100 मीटर, तर खडीकरणाच्या रस्त्याने 900 मीटर अंतरावर आहे.
4. मूळ विस्थापित दरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी ही भाम धरणवस्तीवरील तात्पुरते निवाराशेडमधील वर्गापासून 2.5 कि.मी. अंतरावर आहे.
5. उपरोक्त नमूद दरेवाडी मूळ शाळावगळता अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कोणताही अडथळा नाही.
6. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरवज येथे 3 वर्गखोल्या अतिरिक्त आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरपण येथे 1 वर्गखोली अतिरिक्त आहे.

हेही वाचा:

Back to top button