अंधेरी पूर्व पोटनिवडणूक | भाजपचे मुरजी पटेल आज उमेदवारी अर्ज भरणार | पुढारी

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक | भाजपचे मुरजी पटेल आज उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपने की शिंदे गटाने लढवावी, यावर अद्याप एकमत झालेले नाही. तरीही भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी गुरुवार 13 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपल्या पक्षाने अर्ज मागे घेण्यास सांगितले तर, आपली तयारी असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे भाजप अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार नसल्याचे सांगण्यात येते. तरीही कोणताही धोका न पत्करता भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मुरजी पटेल यांना संकेत दिले. त्यानुसार पटेल गुरुवारी सकाळी 9 वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल करणार आहेत. ऋतुजा लटके यांनी एकनाथ शिंदे गटातून निवडणूक लढवली तर, भाजप आपली उमेदवारी मागे घेणार आहे. मी पक्षादेश पाळणारा कार्यकर्ता असून निवडणूक लढवण्याच्या सूचना आल्या तर लढणार, पक्षाने लढवू नका, असे सांगितले तर, माघार घेणार, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

Back to top button