नाशिक : पोलिसांकडे जमा करावे लागणार ड्रोन | पुढारी

नाशिक : पोलिसांकडे जमा करावे लागणार ड्रोन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील संवेदनशील ठिकाणी नो-ड्रोन फ्लाय झोन जाहीर करूनही लष्करी ठिकाणांवर ड्रोन उडाल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी राष्ट्रीय व सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील सर्व ड्रोनचालकांना त्यांच्याकडील ड्रोन पोलिस ठाण्यात जमा करण्यास सांगितले आहे. याबाबत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शनिवारी (दि. १) आदेश काढले आहेत.

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील लष्करी आस्थापनांपैकी गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) आवारात ऑगस्ट महिन्यात रात्रीच्या सुमारास ड्रोनने घिरट्या घातल्या होत्या. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रतिबंधित व नो-ड्रोन फ्लाय झोन क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी आढळली होती. या प्रकरणी उपनगर व आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना ड्रोन उड्डाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस व लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून सुरू आहे. खबरदारी म्हणून पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी शनिवारी काढलेल्या आदेशात ड्रोन चालक, मालक, ऑपरेटर यांना इशारा देत त्यांचे ड्रोन जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे कोणत्याही कार्यक्रमाकरिता ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यासाठी ड्रोन मालक, चालक व ऑपरेटर यांना पोलिस आयुक्तालयाकडून ड्रोन वापरण्याची लेखी पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मिळाल्यानंतरच जमा केलेला ड्रोन तात्पुरत्या स्वरूपात मिळणार असून, चित्रीकरण पूर्ण होताच तो पुन्हा पोलिस ठाण्यात जमा करावा लागणार आहे. हे आदेश शासकीय, निमशासकीय, लष्करी, वायुसेना, निमलष्करी दले यांच्या स्वमालकीच्या ड्रोन वापरासाठी लागू राहणार नाहीत. मात्र, शहर आयुक्तालयाच्या नागरी हवाई क्षेत्रात उड्डाण करावयाचे असल्यास, त्याबाबत संबंधित पोलिस ठाण्याला आगाऊ माहिती देणे आवश्यक राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हा मनाई आदेश जरी १५ ऑक्टोबरपर्यंत असला, तरी त्यानंतर तो पुन्हा पूर्ववत पंधरवड्यासाठी केला जाणार असल्याचेही पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.

ड्रोन वापरासाठी शुल्क, पोलिस कर्मचारी सोबत : ड्रोन वापरासाठी संबंधितांना शुल्क भरावे लागणार आहे. ड्रोनचा वापर झाल्यानंतर तो पुन्हा पोलिस ठाण्यात जमा करावा लागेल. त्याचप्रमाणे ड्रोन वापराची परवानगी घेतल्यानंतर ड्रोन चालक, मालकासोबत संबंधित पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी सोबत राहणार आहे. पोलिसांच्या देखरेखीखाली त्यांना ड्रोनचा वापर करता येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button