पुणे : जमिनीच्या वादातून सावत्र भावाचा खून | पुढारी

पुणे : जमिनीच्या वादातून सावत्र भावाचा खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जमिनीच्या वादातून सावत्र भावाचा खून केल्यानंतर ओडीशात पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन भावाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी (दि.30) रात्री लोहगावमधील साठेवस्ती येथे घडली घडली. सीताराम कांदन हेंबरम (23, रा. साठेवस्ती, लोहगाव, मूळ. रा. ओडीशा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या अल्पवयीन (वय 16) भावाला ताब्यात घेतले आहे. दोघेही मूळ ओडीशा राज्यातून कामानिमित्त पुण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम हा त्याच्या भावासह कामानिमित्त पुण्यात राहण्यासाठी आला होता. साठेवस्ती येथे दोघेही एकाच रूमवर राहायचे. सीताराम हा कन्स्ट्रक्शनमध्ये मजुरीचे काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. शुक्रवारी (दि.30) रात्री रूमवर आल्यानंतर त्याने दारू पिऊन भावाला शिवीगाळ केली. गावाकडील जमिनीचा वाद आणि सातत्याने दारू पिऊन शिवीगाळ या रागातून अल्पवयीनाने लोखंडी रॉडने सीताराम याला मारहाण केली.

यात गंभीर जखमी झालेल्या सीताराम याला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर अल्पवयीन हा ओडीशातील त्याच्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सचिन जाधव आणि रूपेश पिसाळ यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला लोहगाव बसस्थानकावरून ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ठार मारण्याच्या धमकीने एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रघुवीर लक्ष्मण राठोड (वय 36) नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2021 पासून सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

रघुवीर राठोड हा मार्च 2021 मध्ये त्यांच्या घरी आला व त्याने या अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान आरोपीने दिलेल्या धमकीमुळे तिने अद्यापपर्यंत तक्रार दिली नव्हती. मात्र त्याच्याकडून सतत होणार्‍या अत्याचाराला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिस उपनिरीक्षक लाड तपास करीत आहेत.

हडपसरमध्ये टोळक्याचा राडा
हडपसरमधील रामटेकडी परिसरात टोळक्याने दहशत माजवून राडा घालत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी टोळक्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चिक्क्या भडके, बंटी निकाळजे, मोनू शेख, आर्यन माने, सुनीत शिंदे, चिनू, अनिकेत सोनवणे यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनमोहन मृत्युंजयप्रसाद तिवारी (वय 24, रा. गोसावी वस्ती, हडपसर) याने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनमोहन तिवारी, त्याचे नातेवाईक सागर चतुर्वेदी, प्रिन्स गौतम, आशिष तिवारी, संकर्षण तिवारी हे रामटेकडी परिसरातील अण्णा भाऊ साठे उद्यानाजवळ गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी भडके आणि साथीदार तेथे आले आणि तिवारी व त्याच्या नातेवाइकांना शिवीगाळ केली. टोळक्याने मनमोहन तिवारी आणि आशिष तिवारी यांच्यावर चाकूने वार केले. पोलिस उपनिरीक्षक भोसले तपास करीत

आर्थिक वादातून प्रौढाचा खून
सिंहगड रोड परिसरात एकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुनील राधाकिसन नलवडे (वय 54, रा. फातिमानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, त्यांचा भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच ते सात जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील यांचा झेरॅाक्स यंत्र दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्यांनी काही जणांकडून हातउसने पैसे घेतले होेते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ते एकटेच राहात होते. शुक्रवारी (दि. 30) रात्री नर्‍हे भागातील अभिनव महाविद्यालयाजवळ मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी नलवडे यांना मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Back to top button