स्वच्छ स्पर्धेत पुण्याची घसरण; आठव्या स्थानावरून शहर आता 27 व्या क्रमांकावर | पुढारी

स्वच्छ स्पर्धेत पुण्याची घसरण; आठव्या स्थानावरून शहर आता 27 व्या क्रमांकावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणार्‍या स्वच्छ भारत स्पर्धेत पुणे शहराची घसरण झाली आहे. गतवर्षी 8 व्या स्थानावर असलेल्या पुण्याचे स्थान 27 व्या क्रमांकावर गेले आहे. तर, 10 लाखांच्या पुढील लोकसंख्येच्या शहरांमध्ये पुण्याला 9 वा क्रमांक मिळाला आहे. केंद्र सरकारतर्फे देश पातळीवर दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित केली जाते. सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्थिती, घरोघरी संकलित होणारा कचरा व वस्ती पातळीवर कचर्‍याचे नियोजन, कचर्‍यावरील प्रक्रिया याची प्रत्यक्ष केली जाणारी पाहणी, नागरिकांचा सहभाग, केंद्र शासनाकडून फोनद्वारे नागरिकांकडून घेतला जाणारा अभिप्राय यासह अनेक निकषांचा विचार या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केला जातो.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांची शनिवारी(दि.1) घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते पहिल्या 10 शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत पुन्हा एकदा इंदौर शहराने पहिला क्रमांक पडकावला आहे. तर सुरत शहराचा दुसरा आणि नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. नवी मुंबई सोडून महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहराला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवता आले नाही.

एप्रिल- मे महिन्यात पुणे शहरात केंद्र सरकराच्या पथकाने येऊन पाहणी केली होती. त्यानंतर केंद्राने शनिवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये पुण्याचे नामांकन घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 45 शहरांमध्ये पुणे शहराला पहिल्या दहा मध्ये नववे स्थान मिळवता आले. ओडीएफ फ्री शहरांत प्लस प्लस हा दर्जा मिळाला आहे. तर स्वच्छतेला थ—ीस्टार रँकिंग मिळाले आहे.

कोरोनाच्या काळातही महापालिकेने शहर स्वच्छतेमध्ये तडजोड केली नव्हती. कोरोनानंतर झालेल्या स्पर्धेत 2020 ला पुण्याचा 15 वे नामांकन मिळाले होते. त्यानंतर 2021 मध्ये थेट आठव्या क्रमांकावर झेप घेतली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना मानांकन घसरले आहे. दरम्यान, पुण्याची वाढलेली हद्द व फाइव्ह स्टार रॅकिंग मानांकनासाठी जाहीर केलेल्या निकषांत महापालिकेच्या गुणांमध्ये वाढ होऊ शकली नसल्याने थ—ी स्टार सिटी या मानांकनावर समाधान मानावे लागले आहे.

Back to top button