माणसाच्या दात, जबड्याचा विकास माशांपासून झाला? | पुढारी

माणसाच्या दात, जबड्याचा विकास माशांपासून झाला?

बीजिंग : माकडांपासून उत्क्रांती होऊन मनुष्याचा विकास झाला असे चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतानुसार मानले जाते. मात्र, आता एक अनोखे संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार मानव व अन्य अनेक जीवांच्या जबडा तसेच दातांचा विकास हा चक्क माशांपासून झाला होता. याचा अर्थ माणसाचे मूळ पूर्वज हे माकड नसून त्यांच्याही आधी कोट्यवधी वर्षांपूर्वी पाण्यातून जमिनीवर आलेले मासे आहेत! हे मासेच अनेक पक्षी, सरीसृप व सस्तन प्राण्यांचे पूर्वज होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सागरी जलचरांचा विचार करीत असताना आपल्याला नेहमी शार्कसारखे मासेच आधी आठवतात. अशा माशांचे विक्राळ जबडे व त्यामधील अणुकूचीदार दातही आठवतात. वैज्ञानिकांच्या मते, माशांमध्ये हे जबडे कोट्यवधी वर्षांपासून असे आहेत. तसेच जीवांमध्ये जबड्यांच्या विकासाची सुरुवातही इथूनच झाली होती. उत्क्रांतीच्या काळात हे मासे पाण्याबाहेर येऊन जमिनीवर वेगळ्या रूपात वावरू लागले. त्यामुळेच आज माणसाकडेही जटिल व कच्चे भोजन चावण्यासाठी अनोखा जबडा आहे.

जबड्याच्या विकासाचे पुरावे अलीकडेच दक्षिण चीनमध्ये सापडले आहेत. चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स, क्विजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी आणि बर्मिंघम युनिव्हर्सिटीने हे संशोधन केले असून त्याची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी पाच प्रजातींच्या माशांचे जीवाश्म शोधले आहे. त्यापैकी दोन माशांचे जीवाश्म 43.6 कोटी वर्षांपूर्वीचे तर तीन जीवाश्म 43.9 कोटी वर्षांपूर्वीचे आहेत.

या माशांकडेही माणसासारखा मणका, जबडा आणि दात होते. या सर्वांची उत्क्रांती समुद्रातच 41.9 कोटी ते 44.3 कोटी वर्षांपूर्वीच्या दरम्यान झाली होती. त्याला ‘सिलूरियन काळ’ असेही म्हटले जाते. आतापर्यंत जगभरातील वैज्ञानिकांना या काळातील अधिक जीवाश्म मिळालेले नाहीत. संशोधकांना जियुनोस्टियस मिराबिलिस नावाच्या माशाचे जीवाश्म मिळाले आहे. त्यांची संख्या वीस असून एका माशाची लांबी 1.2 इंच आहे. जबडा असलेला हा सर्वात प्राचीन मासा आहे. शेनकँथस वर्मीफॉर्मिस नावाचा मासा शार्कप्रमाणेच होता. त्याला सध्याच्या शार्कचा पूर्वज म्हटले जाऊ शकते. त्याची लांबी सुमारे एक इंच आहे.

फॅनजिंगशानिया रेनोवेटा, कियानोडस डुप्लिसिस व तुजियास्पिस विविडस नावाच्या प्रजातीच्या माशांचेही जीवाश्म मिळाले आहे. यापैकी तुजियास्पिस विविडसला जबडा नाही. त्याचे पर त्याच्या कवटीतून बाहेर पडलेले आहेत! संशोधकांचे म्हणणे आहे की सर्वात प्रथम 52 कोटी वर्षांपूर्वी मासे अस्तित्वात आले. सुरुवातीला त्यांना जबडा व दात नव्हते. मात्र, उत्क्रांतीच्या टप्प्यात त्यांच्या शरीरात बदल घडले. माशांच्या आधी समुद्रात राहणारे विंचू हेच सर्वात खतरनाक जीव होते. त्यानंतर माशांनाही जबडे व दात मिळाले व त्यांनी समुद्रावर कब्जा केला. पाण्यातून जमिनीवर आल्यावर त्यांची पक्षी, सरीसृप, सस्तन प्राणी आणि मनुष्यांमध्ये उत्क्रांती झाली.

Back to top button