नाशिकमध्ये वाहतुकीसाठी काही मार्ग बंद, तर काही मार्गांत बदल | पुढारी

नाशिकमध्ये वाहतुकीसाठी काही मार्ग बंद, तर काही मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवामुळे बाजारात चैतन्य संचारले असून, देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून, काही मार्गांवरील वाहतूक अन्य रस्त्याने वळवली आहे. विसर्जनाच्या दिवशीही खबरदारी म्हणून शुक्रवारी (दि.9) मुख्य मिरवणूक मार्गासह नाशिकरोड, गंगापूर, सातपूर, सिडको या भागातील विसर्जन स्थळांजवळील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे. यासह सिटीलिंकच्या बसमार्गातही बदल केला आहे.

गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला यावर्षी शुक्रवारी (दि.9) सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. यामुळे सकाळी 10 वाजेपासून मिरवणूक मार्गासहित उपनगरातील काही मार्ग बंद करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिटीलिंक बसेसच्या मार्गांतही बदल करण्यात आले आहेत. यामुळे विसर्जनाच्या दिवशी शहरात प्रवास करणार्‍यांना वाहतूक शाखेचे हे नियम पाळावे लागणार आहेत. शिवाय विसर्जनस्थळी गणेशभक्तांच्या वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांची पथके तैनात केली आहेत.

शहरातील या मार्गांवर बदल:

पंचवटी कारंजा, पंचवटी डेपो आणि सिटीलिंक तपोवन येथून सुटणार्‍या सर्व बसेस पंचवटी डेपोमधून सुटतील.
पंचवटी डेपो -2, सिटीलिंक, महामार्ग, सिडको इत्यादी विभागातून नाशिकरोड रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या बसेस फक्त दत्त मंदिर सिग्नलपर्यंत जातील.  सिन्नरकडे जाणार्‍या बसेस उड्डाणपुलावरून थेट मार्गस्थ होतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणार्‍या बसेस आणि इतर वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूलमार्गे द्वारकाकडून नाशिकरोड, सीबीएसकडे जातील.  नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणार्‍यांची वाहने नांदूर नाक्यावरून औरंगाबाद रस्त्यावरून तपोवनातील जनार्दन स्वामी पुलावरून मार्गस्थ होतील.
चांदशी गाव ते आनंदवली नदीपात्र याकडील दोन्ही बाजूच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. आनंदवलीऐवजी चांदशी रस्त्याने नाशिक तट कालवा येथून मखमलाबाद रोडवरून रामवाडीमार्गे वाहने जातील..

हेही वाचा :

Back to top button