सांगली : स्थायी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज मंगळवारी | पुढारी

सांगली : स्थायी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज मंगळवारी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी मंगळवारी (दि. 13) दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत आहे. बुधवारी सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. सभापती निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी हे पिठासन अधिकारी आहेत.

स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक दि. 14 रोजी आहे. स्थायी समितीतील 19 पैकी 9 सदस्य भाजपचे, 4 काँग्रेसचे व 3 राष्ट्रवादीचे आहेत. स्थायी समितीत भाजपचे बहुमत आहे. सभापती पदासाठी भाजपकडून माजी उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी आणि भाजप महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वाती शिंदे यांच्यात जोरदार चुरस आहे. सूर्यवंशी यांचे पारडे जड दिसत आहे. भाजपचे सदस्य गजानन आलदार हेही प्रबळ इच्छुक आहेत. त्यांनी नेत्यांकडे जोरदार फिल्डींग लावली आहे. दरम्यान, भाजपचे सदस्य संजय कुलकर्णी हेही इच्छुकांच्या यादीत आहेत. भाजपचा सभापती पदाचा उमेदवार ‘वजनदार’ असणार की पक्षाकडून काही धक्कातंत्र अवलंबले जाणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काँग्रेसनेही आघाडीतर्फे सभापती पदाची उमेदवारी लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ 7 आहे. सभापती पदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी उफाळून आली तर त्याचा लाभ उठवायचा, ही रणनीती काँग्रेसची दिसत आहे. काँग्रेसने वेट अ‍ॅण्ड वॉचचा पवित्रा घेतला आहे. भाजपनेही सावध पवित्रा घेतला आहे. दि. 13 रोजीच भाजपची उमेदवारी स्पष्ट होणार आहे. अनंत चतुर्थीनंतर भाजपचे स्थायी समितीचे सदस्य सहलीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button