नाशिक : कांदादराला लागली उतरती कळा; शेतकर्‍यांना खर्चही सुटेना; पाच महिन्यांपासून ग्रहण | पुढारी

नाशिक : कांदादराला लागली उतरती कळा; शेतकर्‍यांना खर्चही सुटेना; पाच महिन्यांपासून ग्रहण

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांदा पिकाचे दर मात्र चांगलेच घसरलेले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सहा ते 14 रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. कांद्याचा भाव एवढा कमी झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांदादर घसरत असल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणारा उन्हाळ कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीत साठवून ठेवलेला होता. चांगला दर मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकर्‍यांनी अजूनही कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे या कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतके दिवस कांदा साठवूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी 600 सरासरी 1,251 तर जास्तीत जास्त 1,490 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून कांदा शेतकर्‍यांना रडवतो आहे. प्रचंड खर्च करून मेहनतीनंतरही महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांवर केवळ 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. पुढील महिन्यापासून देशातील मोठ-मोठ्या शहरांमध्ये नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याची विक्री सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचा आणखी वांदा होईल, असे शेतकर्‍यांना वाटत आहे.

हेही वाचा :

Back to top button