कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे ‘मॅपिंग’, वन्यजीव विभागातर्फे अॅपची निर्मिती | पुढारी

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे ‘मॅपिंग’, वन्यजीव विभागातर्फे अॅपची निर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सॅटेलाइटद्वारे मॅपिंग करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यासाठी मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात येणार असून, त्याद्वारे पर्यटकांना अभयारण्यात मार्ग शोधणे, हेल्पलाइन, ब्लॅक स्पॉट, हॉटेल्स आणि ट्रेकिंगची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे हे ॲप इंटनेटशिवायही सुरू राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय टळणार आहे.

पर्यटकांना गड-किल्ल्यांवर जाणाऱ्या रस्त्यांसह धोकादायक ठिकाणे माहिती नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळते. मोबाइलला नेटवर्क नसल्याने मदत मागविताना अडचणी येतात. काही दिवसांपूर्वीच कळसूबाई शिखरावर सुमारे ५०० पर्यटक अडकले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने कार्यरत राहणाऱ्या मोबाइल ॲपच्या निर्मितीसाठी उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

दरम्यान, ॲपमध्ये अभयारण्यातील सर्व माहितीसहित हेल्पालाइन क्रमांकही देण्यात येणार आहे. अभयारण्यातील जैवविविधता, पर्यटनस्थळे, नियमावली, धोकादायक आणि अपघातांची ठिकाणे आदी माहिती दिली जाणार आहे. तसेच गड, किल्ले व इतर मार्गांचे तीन गटांत वर्गीकरण करण्यात येईल. खडतर मार्गासाठी लाल, मध्यम मार्गासाठी पिवळा तर सोयीस्कर मार्गासाठी हिरवा रंग असणार आहे.

सर्वच हंगामात अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे काही ठिकाणी ई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, इंटरनेटअभावी त्याला मर्यादा येतात. अभयारण्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात येणार आहे. हे ॲप ऑफलाइनही कार्यरत राहू शकणार आहे.

– गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

Back to top button