नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन | पुढारी

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सततच्या बदलत्या हवामानामुळे नाशिक शहरात स्वाइन फ्लू या साथरोगाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत 13 रुग्ण आढळून आले असून, मागील महिन्यात दोन रुग्ण असे नाशिक शहरात 15 रुग्ण आढळले आहेत. यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले नव्हते. परंतु, त्या आधीच्या प्रत्येक वर्षामध्ये नाशिक शहरात 250 ते 300 रुग्णांची संख्या राहिलेली आहे. यामुळे यंदाही स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील महिन्यात जूनमध्ये शहरात केवळ दोन रुग्ण होते. जुलै महिन्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या 13 इतकी झाल्याने रुग्णसंख्येतील ही वाढ चिंता निर्माण करणारी आहे. स्वाइन फ्लू हा साथीचा आजार हवेतून ‘एच-1 एन-1’ या विषाणूमुळे पसरतो. या आजारामुळे रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या अशी लक्षणे दिसून येतात. परंतु, योग्य व वेळीच उपचार घेतले तर या आजारातून रुग्ण बाहेर पडू शकतो. परंतु, आजार अंगावर काढला आणि दुसर्‍या टप्प्यात गेल्यास श्वसनास त्रास होऊन रुग्ण दगावण्याची भीती असते. यामुळे लक्षणे आढळून आल्यास घरच्या घरी उपचार न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

रुग्णांनी तसेच इतरही आजार असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. मास्क लावणे तसेच वारंवार हात स्वच्छ धुणे ही काळजी घेतली पाहिजे. तसेच रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी आणि पाणी भरपूर पिण्याबरोबरच आहारात ‘सी’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला डॉ. नागरगोजे यांनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button