नाचता-नाचता गेला होता लोकांचा जीव! | पुढारी

नाचता-नाचता गेला होता लोकांचा जीव!

पॅरिस : लग्नात किंवा अन्य समारंभात नाचत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन जागीच गतप्राण होणार्‍या काही लोकांची उदाहरणे आहेत. मात्र, अनेक लोक एकत्र येऊन नाचत असताना ते मृत्युमुखी पडल्याची एक घटना 500 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये घडली होती. या घटनेचे गूढ अद्यापही उकलले नाही.

हे प्रकरण सन 1518 मधील आहे. प्राचीन रोमन साम—ाज्यातील अल्सेसच्या स्ट्रासबर्गमध्ये म्हणजेच सध्याच्या फ्रान्समध्ये अशीच एक विचित्र महामारी पसरली ज्याला आपण आता ‘डान्सिंग प्लेग’ किंवा ‘डान्स एपिडेमिक’ असे म्हणतो. ही नृत्याची महामारी जुलै 1518 ते सप्टेंबर 1518 मध्ये सुरू होती. त्यामध्ये सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला असे म्हटले जाते. सन 1518 मध्ये जुलै महिन्यात एका तरुणीने अचानक नृत्य करण्यास सुरुवात केली आणि ती नाचत असताना तिचे भान हरपले.

या मुलीचे नाव होते फ्राऊ ट्रॉफी. ती नाचत नाचत घराबाहेर गेली व रस्त्यावरही नाचू लागली. तिला समजावण्यासाठी आलेले नातेवाईकही नाचू लागले. त्यानंतर तिथे लोकांची गर्दी झाली व नाचत असतानाच अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नाचण्याची ही महामारीच सुरू झाली व अनेक भागातील लोक नाचू लागले. अनेक दिवस त्यांचा नाच सुरूच राहिला आणि तो थांबेना! त्यामधील अनेकांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अनेक संशोधक या घटनेला काल्पनिक मानतात. नाचण्याची महामारी कशी येऊ शकते किंवा नाचत असताना अनेक लोक कसे मृत्युमुखी पडू शकतात, असे या संशोधकांना वाटते! मात्र स्ट्रासबर्ग सिटी कौन्सिलच्या व अन्य काही धार्मिक स्थळांमधील कागदपत्रांमध्येही नाचत असताना मृत्यू झालेल्या लोकांच्या नोंदी आहेत. काही लोक हा अन्नातून विषबाधा होऊन डोक्यावर परिणाम झाल्याचा किंवा ‘मास हिस्टेरिया’चा प्रकार असावा असे मानतात.

Back to top button