नाशिक : 171 पोलिस उपनिरीक्षकांनी घेतली शपथ, पहा सोहळ्यातील खास फोटो | पुढारी

नाशिक : 171 पोलिस उपनिरीक्षकांनी घेतली शपथ, पहा सोहळ्यातील खास फोटो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संविधान आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे व्रत घेऊन कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी घेत कर्तव्यावर रुजू होणार्‍या तब्बल 171 पोलिस उपनिरीक्षकांचा दीक्षान्त सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उत्साह, आनंद अन् भावनिकता असे विविध रंग या सोहळ्यादरम्यान दिसून आले. सहा प्लॅटूनमध्ये सहभागी होत पोलिस निरीक्षकांनी अत्यंत शिस्तबद्ध संचलन केले. यावेळी उपस्थित आप्तस्वकीयांचा ऊर अभिमानाने भरून गेला.

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या कवायत मैदानावर सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये 121 व्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ, अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार यांच्यासह पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, अकादमीचे संचालक राजेश कुमार उपस्थित होते. सोहळ्यात नाशिकचे भूमिपुत्र राजू विष्णू सांगळे (रा. वडगाव, सिन्नर) यांना राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते मानाची रिव्हॉल्व्हर (रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर) प्रदान करण्यात आली, तर सोलापूरच्या ऊर्मिला खोत या उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरल्या.

नाशिक ः दीक्षान्त सोहळ्यात आपल्या सहकार्‍यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्यात येत होते. (छाया ः हेमंत घोरपडे)

यावेळी मार्गदर्शन करताना महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, प्रशिक्षणानंतर आता पोलिस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रशिक्षण आणि अनुभवाची सांगड घालून सर्वसामान्यांशी संवेदनशील वर्तणुकीची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. समाजातील दुर्बल, न्यायाच्या अपेक्षेने येणारे समाजघटक आणि महिला-बालकांना कायदेशीर मार्गाने न्याय देण्याचा प्रयत्न करावा. सोशल मीडियामुळे सामाजिक जागृती वाढल्याने सदैव सतर्क, चौकस पोलिस अधिकार्‍यांची जबाबदारी वाढली आहे. पारंपरिक तपासासह सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीच्या आव्हानासह डिजिटायझेशनमध्येही स्वत:ला अद्ययावत राहणे गरजेचे आहे. पोलिस हे शासनाचे महत्त्वाचे अंग असून, समाजाला पोलिसांकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे निष्कलंक सेवा बजावण्याचेही आवाहन यावेळी सेठ यांनी केले.

प्रारंभी, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन करीत मानवंदना दिली. अकादमीचे संचालक राजेश कुमार यांनी प्रास्ताविक केले. परेड कमांडर म्हणून सुजित पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. 171 जणांचा तुकडीत 158 पुरुष व 13 महिला उपनिरीक्षकांचा समावेश आहे. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

नाशिकचे भूमिपुत्र राजू सांगळेंना तीन किताब

नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले व मूळचे वडगाव (ता. सिन्नर) येथील राजू सांगळे हे या तुकडीचे मानाच्या रिव्हॉल्व्हर किताबाचे मानकरी ठरले. तसेच, बेस्ट कॅडेट ऑफ स्टडिज् (सिल्व्हर बॉटन) आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा किताबही सांगळे यांना प्रदान करण्यात आला. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते मानाची रिव्हॉल्व्हर व चषक प्रदान करण्यात आला.

26/11 चे साक्षीदार..

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस दलाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे जगदेवप्पा पाटील हेदेखील या बॅचचे आकर्षण ठरले. त्यांनी सहाव्या प्लॅटूनचे कमांडर म्हणून संचलन केले. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले पाटील 1 मे 2004 रोजी राज्य राखीव पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी जिवंत नक्षलवाद्यास पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्याचबरोबर 26/11 च्या हल्ल्यावेळी ते हॉटेल ताजमध्ये बंदोबस्तात होते. शहीद राहुल शिंदे यांचे पार्थिव आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

आनंद अन् अश्रू
दीक्षान्त सोहळ्यासाठी 171 प्रशिक्षणार्थींचे आप्तस्वकीयदेखील उपस्थित होते. यावेळी आपल्या मुलाला संचलन करताना बघून उपस्थित आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. काहींना तर अश्रू अनावर झाले होते. ‘मुलगा मोठा साहेब झाला’ या भावनेने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. काही प्रशिक्षणार्थींच्या पत्नी तसेच मुलेही उपस्थित होते. त्यांनी पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी काहीशी भावुकता बघावयास मिळाली.

 

ऊर्मिला खोत अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी,,
सांगली येथील ऊर्मिला खोत यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2003 पासून त्या पोलिस सेवेत हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. चारदा प्रयत्न केल्यानंतर पाचव्यांदा त्या 2011 च्या बॅचमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरल्या. त्यांनी पारधी गँगची दहशत मोडून काढण्याची कामगिरी बजावली.

हेही वाचा :

Back to top button