Nashik: दिंडोरी तालुक्यात रासायनिक खतांचे लिंकिंग ; शेतक-यांना भुर्दंड | पुढारी

Nashik: दिंडोरी तालुक्यात रासायनिक खतांचे लिंकिंग ; शेतक-यांना भुर्दंड

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा 
दिंडोरी तालुक्यात सध्या बऱ्याशा प्रमाणात रासायनिक खतांचा पुरवठा उपलब्ध झाला असला तरी सध्या काही  कंपन्याकडून या खतावर मोठ्या प्रमाणात लिंकिंग होत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यातील कृषी विभागाने त्वरित लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. (Nashik)

सध्या तालुक्यात खरीपच्या हंगामाची पूर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली असून खरीपाच्या तोंडावर नामाकिंत खत कंपन्याकडून २४.२४.०, १८.४६.०, १०.२६.२६ अशा महत्वाच्या खतावर ४०० ते ५०० रुपयाचे इतर खत दिले जात असल्यामुळे १९०० रुपयांच्या रासायनिक खतांची ४० किलो वजनाची गोन २४०० रुपयांना पडत असल्यामुळे शेतक-यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे.  (Nashik)

कृषी केंद्रामध्ये रासायनिक खते खरेदी करताना दुकानदार कंपनीने सक्ती केली असून या खतावर हे ४०० किंवा ५०० रुपयाचे खत घ्यावेच लागेल अशी सक्ती केली जात आहे. सर्व पिकांच्या वाढीसाठी तसेच फुगवणीसाठी रासायनिक खत शेतकरी वर्गाला घ्यावाच लागते, त्यात रासायनिक खताच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे सर्व पिकाला शासनाचा शाश्वत हमीभाव नसल्यामुळे कायमच बळीराजाची निराशा होत आहे. अनेक तर रासायनिक खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. सध्या तालुक्यातील अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळाले असले तरी १०० टक्के सेंद्रीय शेती अजून यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रासायनिक खताशिवाय उत्पादन वाढू शकत नाही असे अनेक प्रयोगशील शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.

रासायनिक खताच्या टंचाई व लिंकिंग बाबतीत बळीराजाला ‘तोंड बांधून मुक्याचा मार, या म्हणीचा प्रत्य येत आहे. तक्रार करावी तर दुकानदार आपल्याला खत देणार नाही, त्यामुळे शेतकरी हे सर्व लिंकिंगचे वाढलेले प्रमाण सहन करीत आहे. त्यामुळे या लिंकिंगला नेमके कोण जबाबदार असा प्रश्न पडला आहे. या सर्व प्रकाराबाबत तालुक्यात कृषी विभागाने चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

दिंडोरी तालुक्यात सध्या रासायनिक खताच्या खरेदीवर लिंकिंगचे प्रमाण वाढत असून शेतकरी वर्गाला अार्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे गरज नसताना इतर खते व औषधे खरेदी करावी लागत आहे. आधीच शेतकरी कर्जबाजारी झाले असून त्यात रासायनिक खताची टंचाई व लिंकिंगची भर पडत असून कृषी विभागाने त्वरित चौकशी करून रासायनिक खतावरील इतर खताची व औषधाची सक्ती थांबवावी
– संदिप बर्डे, शेतकरी ओझे

हेही वाचा :

Back to top button