वेदनांवर ‘मदर्स’ची फुंकर | पुढारी

वेदनांवर 'मदर्स'ची फुंकर

नाशिक : जिजा दवंडे

देशात कोरोना व्हायरसच्या लाटेत लाखो नागरिकांना आपले जीव गमवावे लागले. त्यातल्या प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. महामारीच्या या काळात जो तो स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपडत असताना, आरोग्य यंत्रणा मात्र या आपत्कालीन परिस्थितीत योद्ध्याप्रमाणे लढत होती.

विशेषतः आरोग्य यंत्रणेतील महत्त्वाचा घटक असलेल्या परिचारिका जीवाची पर्वा न करता रुग्णांची काळजी घेताना दिसल्या. त्यांच्यातील ममत्वाने कोट्यवधी रुग्णांना जीवदान दिले. असे असले तरी कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग होऊन अनेकींना प्राणाला मुकावे लागले. आज कोरोनातून जग सावरत असताना मागे वळून पाहिल्यानंतर यातील अनेक वेदनादायी आठवणी मनाला खिन्न करून जातात. रुग्णसेवा बजावताना मृत्यू आलेल्या अशाच एका परिचारिकेची कथा मातृदिनाच्या निमित्ताने नाशिकमधील हौशी कलाकरांनी ‘मदर्स’ या लघुपटाच्या माध्यमातून पुढे आणली. हा लघुपट कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यू आलेल्या हजारो कोरोनायाेद्ध्यांच्या वेदनांना वाट मोकळी करून देणारा खरा श्रद्धांजलीपट ठरत आहे. देशभरात लाॅकडाऊनमुळे पतीची नोकरी गेल्याने घर, कुटुंब सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी अंगावर, तर दुसऱ्या बाजूला अपुऱ्या साधनसामग्रीच्या जीवावर कोरोना रुग्णांची सेवा करणारी ‘प्रिया’ (परिचारिका) आपल्या चिमुकल्या मुलीला घरी एकटे सोडून रुग्णालयात राहते. यामुळे एका बाजूला कर्तव्य, तर दुसऱ्या बाजूला ‘आई’ची माया अशा द्विधा स्थितीत कर्तव्य बजावणारी प्रिया जेव्हा रुग्णांनाच आपली लेकरं मानते.

झपाटल्यागत काम करणारी ‘प्रिया’ एक दिवस कोरोना संसर्गाला बळी पडून मृत्यू पावते. त्यानंतर मुलगी काव्याची आईला भेटण्यासाठी असलेली तगमग प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी आहे. हौशी कलाकरांनी साकारलेल्या या ‘मदर्स’ला राज्यभरातील आरोग्य यंत्रणेबरोबरच सर्वच स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे. या लघुपटाचे लेखन सिन्नरचे कपिल पठाडे यांनी, तर दिग्दर्शन नाशिक येथील कलाकार संदीप महाजन, विजय जाधव यांनी केले. यातील परिचारिकेची प्रमुख भूमिका नवोदित अभिनेत्री स्नेहा पाडेवार हिने उत्तम पद्धतीने साकारली आहे. याशिवाय बालकलाकार कस्तुरी पवार, अनिता पाटील, संदीप महाजन, वैशाली शिंदे, रवींद्र जगताप आदींच्या भूमिका आहेत. नाशिककर कलाकारांनी केलेल्या या प्रयत्नाला महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळत असून, कोरोनायोद्ध्यांच्या वेदनांवर नक्कीच ‘मदर्स’च्या माध्यमातून फुंकर घालण्याचे काम झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button