कोल्हापूर; अनिल देशमुख : अमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती स्थापन केली जाणार आहे. याबाबतची तत्काळ कार्यवाही सुरू करा, असे आदेश राज्याच्या अपर गृह सचिवांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
अमली पदार्थांचा वाढता वापर पालकांसह देशासाठीही चिंताजनक ठरत आहे. तरुणाईभोवतीचा अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या मागणीने त्याच्या तस्करीचे प्रमाणही वेगाने वाढत चालले आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. अमली पदार्थांच्या सेवनाने तरुणांच्या भविष्यांवर गंभीर परिणाम होऊ लागल्याचे विदारक चित्रही अनेक ठिकाणी दिसत आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नार्को कोऑर्डिनेशन सेंटर यंत्रणा सुरू केली आहे. देशातील, राज्यातील अमली पदार्थांबाबत धोरणात्मक बाबतीत समन्वय साधणे आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर अमली पदार्थांबाबतच्या समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी या यंत्रणेकडून काम केले जात आहे. या यंत्रणेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती स्थापन केली जाणार आहे.
देशस्तरावर झालेल्या आढावा बैठकीत या समित्यांची गरज राज्य शासनाच्या गृह विभागाने स्पष्ट केली आहे. मात्र, अनेक जिल्ह्यात अशा समित्या अद्याप स्थापन झालेल्या नसल्याचे या बैठकीत समोर आले. याची राज्याच्या गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती तत्काळ स्थापन करा, असे आदेश गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. या समित्या स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यांनी त्यांची बैठक झाली पाहिजे. या प्रत्येक बैठकींचा अहवालही गृह विभागाला सादर करावा लागेल, असेही त्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.