धुळे : तब्बल वीस तासानंतर मुंबई आग्रा महामार्गावरील रहदारी सुरळीत | पुढारी

धुळे : तब्बल वीस तासानंतर मुंबई आग्रा महामार्गावरील रहदारी सुरळीत

धुळे: पुढारी वृत्तसेवा : धुळे शहरालगत गॅस टँकर उलटून अपघात झाल्यानंतर तब्बल २० तासानंतर मुंबई आग्रा महामार्गावरील रहदारी सुरळीत करण्यात पोलिस दलास यश आले आहे. संपूर्ण रात्र जागून गॅस कंपनीच्या तंत्रज्ञानी गॅस गळती बंद करून टँकर हटवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

धुळे शहरा लगत मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल नालंदाजवळ इंदूरकडून भरधाव येणा-या ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजक तोडून टँकर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन उलटला. त्यामुळे टॅंकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. सदर गॅस हा स्फोटक असल्याचे निदर्शनास येताच पोलीस पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील रहदारी ही चाळीसगाव रोड मार्गे तिरंगा चौकातून ८० फुटी रोडवरून परत महामार्गावर वळविली होती. त्यानंतर बीपीसीएल कंपनीचे तंत्रज्ञ यांनी जळगाव येथून धुळ्यात रात्री उशिरापर्यंत टॅंकरमधून होणारी गॅसगळती टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या मदतीने गॅस गळती ठिकाणी रात्रभर पाण्याचा फवारा मारला. मंगळवारी (दि.१२) दुपारी उशिरापर्यंत तब्बल वीस तास चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पथक धुळे शहरातून महामार्गावर वळवण्यात आलेल्या रहदारीवर कार्यरत होते. गॅस कंपनीच्या तंत्रज्ञांनी मंगळवारी गळती असलेल्या भागाची दुरुस्ती करून गॅस गळती रोखली. तोपर्यंत टँकरमधील गॅसगळती होऊन गॅस वातावरणात मिसळत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग पाणी मारणे सुरूच ठेवल्यामुळे कोणतीही दुदैवी घटना घडली नसून टँकर रस्त्याच्या कडेला केल्यानंतर रहदारी पूर्ववत सुरळीत झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button